26.8 C
Ratnagiri
Saturday, July 26, 2025

राज्यात म्हणे ८ मंत्र्यांना नारळ देणार! कोकणातील ४ पैकी कोण जाणार?

ज्या ८ मंत्र्यांवर टांगती तलवार आहे, त्यामध्ये...

राजापूरमध्ये एसटी बस, दुधाच्या टँकरमध्ये अपघात

ओणी पाचल मार्गावर पाचलकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली-रत्नागिरी...

हमीभाव दूरच आंबा-काजूला खात्रीचं मार्केटही नाही

बळीराजाच्या जीवनात संपन्नता न येण्याची अनेक कारणं...
HomeRatnagiriस्मार्ट मीटर विनापरवाना बसवण्यास विरोध महावितरणची प्रक्रिया वादात

स्मार्ट मीटर विनापरवाना बसवण्यास विरोध महावितरणची प्रक्रिया वादात

या विरोधात सरपंच संघटनेने एल्गार पुकारला आहे.

ग्रामस्थांना तसेच तेथील ग्रामपंचायतींना विश्वासात न घेताच घरोघरी स्मार्ट वीजमीटर बसवण्यात येत आहेत. या विरोधात सरपंच संघटनेने एल्गार पुकारला आहे. महावितरण कंपनीने ठेकेदार एजन्सीमार्फत सुरू असलेली ही स्मार्ट मीटरची जोडणी तातडीने थांबवावी यासाठी साखळी उपोषणाद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्धार सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. यावरून तालुक्यात स्मार्ट मीटर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरपंच संघटनेचे अध्यक्ष व चिवेलीचे सरपंच योगेश शिर्के यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देत स्मार्ट वीजमीटरला सरपंच संघटनेचा विरोध असल्याचे कळवले होते. हे वीजमीटर बसवण्यासाठी ग्राहकांची कोणतीही संमती घेतली जात नाही. ग्रामपंचायतीची परवानगी देखील घेत नाहीत त्यामुळे हे थांबवावे, अशी मागणी केली होती. कळंबस्ते येथील श्री काळेश्वरी कांचनी सभागृहात सरपंच संघटनेची बैठक झाली. या बैठकीत देखील हा मुद्दा गाजला. या बैठकीत महावितरण कंपनी व ठेकेदार एजन्सी यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढण्यात आले.

आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून स्मार्ट वीजमीटरच्या कामाविरोधात साखळी उपोषण छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच त्याची दिशा ठरवण्याचे निश्चित करण्यात आले. या आंदोलनात आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनाही सामावून घेतले जाणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्मार्ट वीजमीटरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आमदार जाधव व निकम यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. या बैठकीत तहसील कार्यालय, वनविभाग, बीएसएनएल टॉवर, जिल्हा परिषद आदी विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मालघरचे सरपंच सुनील वाजे व बिवलीच्या सरपंच स्नेहा वाजे यांची नवीन सदस्य म्हणून समितीत बिनविरोध निवड झाली.

RELATED ARTICLES

Most Popular