कुणबी-ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे आहे. इतर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही; मात्र आमच्या आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार कुणबी समाजोन्नती संघ राजापूर शाखेच्या बैठकीमध्ये करण्यात आला. कुणबी-ओबीसी आरक्षण वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांनी केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी समाजाच्या वतीने कुणबी एल्गार आंदोलन छेडण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राजापूरमध्ये कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याच्या पूर्वतयारीसाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर कार्यकारिणी आणि कुणबी समाजनेत्यांची बैठक झाली. बैठकीला रवींद्र नागरेकर, प्रकाश कुवळेकर, दीपक बेंद्रे, चंद्रकांत जानस्कर, प्रकाश लोळगे, श्रीकांत राघव, रमेश सूद, प्रतीक मटकर, जितेंद्र पाटकर, सुभाष नवाळे, रमेश गोडांबे, नंदकुमार मिरगुले आदी उपस्थित होते.
नागले यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची सद्यःस्थिती आणि कुणबी-ओबीसी आरक्षण बचावाची आवश्यकता सांगितली. कुणबी समाजासह ओबीसी बांधवांसाठी ओबीसी आरक्षण नागले यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची सद्यःस्थिती आणि कुणबी-ओबीसी आरक्षण बचावाची आवश्यकता सांगितली. कुणबी समाजासह ओबीसी बांधवांसाठी ओबीसी आरक्षणामध्ये अन्य समाजाचा समावेश करून त्यांची घुसखोरी कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ओबीसी आरक्षण बचाव लढा अधिक तीव्र करण्यासाठी कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहामध्ये सकाळी १० वाजता होणाऱ्या या मेळाव्यामध्ये कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन – कुणबी-ओबीसी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी खपवून घेणार नाही, यासाठी उद्या (ता. २६) आयोजित केलेल्या एल्गार मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.