रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत डांबर खरेदीमध्ये अनियमितता आढळली आहे. चलन नसताना पालिकेने पैसे अदा केले आहेत. यामध्ये सुमारे ४४ कोटी ६९ लाखांची अनियमितता आढळून आल्याचे आम्ही मागवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली पुढे आले आहे. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीकडून चलन घेण्यात आली नाहीत, असा आरोप माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी केला. येथील हॉटेल व्यंकटेशमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुलगा मिहिर आणि विराज माने उपस्थित होते. सत्तेत असताना आपल्या राजकीय पदाचा उदय सामंत यांनी गैरवापर केल्याचाही आरोप करून, या प्रकरणाची सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दिली असून, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केल्याचेही माने यांनी सांगितले. ‘माहितीचा अधिकार कायदाअंतर्गत मिळवलेल्या कागदपत्रांचे परीक्षण केले असता नगरपरिषदेच्या हद्दीतील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांची कामे सामंत कंत्राटदार प्रा. लि. या कंपनीला देण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या कंपनीस एकूण सुमारे ११४ कोटी ८२ लाख ८२ हजार १२२ इतक्या रकमेची रस्त्याची कामे देण्यात आली. त्यापैकी ४४ कोटी ६९ लाख २७ हजार रकमेच्या डांबरी रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता आढळून आली. संबंधित कंपनीचे चलन दिले नाही. चलन न तपासताच पालिकेने त्यांची देयके अदा केली आहेत. चलन सादर करणे आणि त्यांची तपासणी करणे अनिवार्य आहे. या नियमांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून देयके दिल्याने शासकीय निधीचा अपव्यय व गैरवापर झाल्याचा संशय असून, याची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणीही त्यांनी केली. रत्नागिरी पालिकेमार्फत झालेले सर्व रस्त्यांच्या कामांचे तांत्रिक आणि वित्तीय फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. कामाशी संबंधित सर्व मूळ आणि डिजिटल नोंदी तातडीने सील करून सुरक्षित ठेवण्यात याव्यात. ४४ कोटी निधीचा अपव्यय किंवा गैरवापर झाला असल्यास त्याची पारदर्शक चौकशी होऊन दोषर्षीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार बाळ माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

