रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दुसरी लाट अजून संपलेली नाही, शासन ती आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. अनेक विविध योजना राबवून शासन कोरोना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोग्य विभागाने पूर्वीच कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या येण्याची शक्यता वर्तवली असताना, ज्यामध्ये ती लाट लहान मुलांवर जास्त प्रभावी ठरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत.
खेडमधील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सुसेरी नं. १वाडीतील एकाच कुटुंबातील ४ लहानग्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजल्यावर तिसऱ्या लाटेबद्दल चर्चांना उधाण आले आहे. सदरची मुले २ ते १४ वयोगटातील आहेत. एकाच घरातील चार बालके बाधित झाल्याने आतोग्या यंत्रणा एकदम सतर्क झाली आहे.
परंतु, चौकशी अंती समजले कि, त्या मुलांचे आई वडील याआधी कोरोना बाधित झालेले होते, त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्याने या लहान मुलांना सुद्धा बाधा झाली. बालकांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने, त्यांना पुढील उपचाराकरिता शिवतेज कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोरे यांनी सांगितले कि, चारही मुलांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचप्रमाणे कोरेगाव आरोग्य केंद्रातील गावांमध्ये सध्या ६६ सक्रीय रुग्ण असून त्यातील २५ विलगीकरणामध्ये असून उर्वरित ३५ रुग्ण हे संस्थात्मक विलागीकरणामध्ये आहेत. आरोग्य केंद्रामार्फत तीन हजार पाचशे सहा जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर जास्त प्रभाव पडणार असल्याची बातमी ताजी असताना, हि एकाच कुटुंबातील चार मुले एकत्र बाधित झाल्याने तिसऱ्या लाटेची शंका गावामध्ये पसरू लागली, पण चार मुले संसर्गित झाल्याने तिसरी लाट आली असा अर्थ होत नाही, अशी कोणतीही शंका मनात बाळगून न घाबरण्याचे, अशा कोणत्याही अफवेकडे लक्ष न देण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले आहे.