महायुतीचे काही नेते बेताल वक्तव्य करत आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने ते बोलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मताशी सहमत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे नाव न घेता जनसंवाद यात्रेत टोला लगावत्ा. भाजप आमदार नीतेश राणे मागील काही दिवसांपासून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करून राज्यात त्यांच्याविरोधात बोलत आहेत. यावर उपमुख्यमंत्री पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी भाष्य केले.
मात्र, आमदार नीतेश राणे यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले, अजित पवार म्हणाले, सर्वांनी आपले विचार मांडावेत; पण ते मांडत असताना कोणत्याही समाजात दुही निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सर्वांनी जपला पाहिजे. राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते, तेव्हा त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होते. हे होता कामा नये.
तुम्हाला तुमच्या विचारधारा मांडायच्या असतील, तर तुम्ही मांडू शकता; परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगले नाही. तटकरे म्हणाले की, शाहू-फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. अल्पसंख्याक समाजाबद्दल चुकीचे बोललेले कदापी खपवून घेणार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्या गोष्टींचा तीव्र विरोध करत राहौल. कठोर शब्दांत आम्ही त्यांचा विरोध करू. बहुजन समाजाचे हित जपण्याकरिता सत्ता हवी आहे. म्हणून आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.