इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगीतलेल्या कार्यक्रमामध्ये भारताचे पहिले अंतराळ मिशन गगनयानसाठी पारंपारिक इंधनाचा वापर न करता हरित इंधन वायूचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून इस्रो प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच भविष्यकाळातील इस्रोच्या सर्व मोहिमांमध्ये हरित इंधनाचा वापर करण्यावरच जोर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाच्या सरकारशी इस्रो कोको बेटावर गगनयान मिशनसाठी ग्राऊंड स्टेशन बनविण्यासाठी बोलणी करत प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, ऑस्ट्रेलियामध्ये इस्रोला NAVIC ग्राऊंड स्टेशन उभे करायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी जागतिक स्तरावर नेतृत्व करायची इस्रोची महत्वाकांक्षा असल्याचेही इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.
के. सिवन पुढे म्हणाले की, इस्रोचे मुख्य ध्येय असे आहे कि, भारतातील अंतराळ क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि इतर गरजांची पूर्ती करणे. देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इतर सर्वच क्षेत्राला इस्रोच्या होणार्या विविध मोहिमांचा कशाप्रकारे फायदा होईल यावर आमच जास्त लक्ष केंद्रित आहे. त्याप्रमाणेच के.सिवन हरित इंधनाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आगामी काळात हरित इंधनाचा वापर करणे गरजेचे असणार आहे. आम्ही या गगनयान मिशनमध्ये पूर्व नियोजन करून हरित इंधनाचा वापर करणार आहोत व इस्रोने त्याची संपूर्ण तयारीही केली आहे. तसेच विषारी आणि धोकादायक अशा सर्व घटकांचे निर्मूलन होण्यासाठी भविष्यातील इस्रोच्या सर्वच मिशनमध्ये हरित इंधनाचा वापर करण्यात येणार असून, ती काळाची गरज आहे.
के. सिवन यांनी रॉकेट लॉन्च व्हेईकलमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी हरित इंधनाचा लवकर वापर करण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले. कोरोनाचा फटका इस्रोच्या गगनयान मिशनलासुद्धा मिळाल्याचे दिसत आहे. या मिशनच्या माध्यमाद्वारे 2022 पर्यंत तीन भारतीयांना अंतराळात पाठवायचे इस्रोचे ध्येय ठेवले होते. विश्वातल्या अगदी बोटावर मोजण्याएवढ्या देशांनी यशस्वीपणे मॅन मिशन यशस्वीपणे पार केल आहे. भारताकडूनही आता गगनयानच्या माध्यमातून अंतराळात माणूस पाठविला जाणार आहे. गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळमोहिमेमध्ये महिला वैमानिकाचा समावेश नसेल, असे इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. या मोहिमेसाठी इस्रो लष्करातील अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, सध्याच्या घडीला कोणत्याही दलामध्ये आवश्यक असणार्या श्रेणीतील महिला वैमानिक उपलब्ध नाही, असे अधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे. तसेच गगनयान मोहिमेसाठी भारताने रशियाबरोबरच फ्रान्सशीही सहकार्याचा करार केल्याचे समजते आहे. गगनयानाचे पहिले उड्डाण २०२२ सालामध्ये होणार असून, तीन प्रशिक्षित अंतराळवीर या यानामध्ये असतील. जरी या पहिल्या उड्डाणामध्ये महिला अंतराळवीराचा समावेश केला गेला नसला तरी आगामी काळातील उड्डाणांमध्ये नक्कीच सामान्य माणसांचा समावेश केला जाणार असून, त्यामध्ये महिलाचाही समावेश असेल, असे इस्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले.