२०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केल्यानंतर आता तिची ड्रेस डिझायनर लिपाक्षीची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २१ सप्टेंबर रोजी त्यांची सुमारे ७ तास चौकशी केली. यादरम्यान पोलिसांनी जॅकलिन आणि सुकेशच्या लिपाक्षीच्या नात्यावर अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले.
सुकेशने जॅकलिनच्या फॅशन डिझायनर लिपाक्षीच्या खात्यावर ३ कोटी रुपये पाठवले होते. या पैशातून लिपाक्षीने डिझायनर कपडे, कार आणि जॅकलिनच्या आवडीचे गिफ्ट्स तिला दिले होते. जॅकलीनला आर्थिक गुन्हे शाखेच्या कडून चौकशी केली असता, सुकेशकडून मिळालेल्या गिफ्ट्स, डिझायनर कपडे आणि कारबाबत तिची चौकशी करण्यात आली.
आर्थिक गुन्हे शाखेकडून लिपाक्षीला अनेक प्रश्न विचारण्यात आले, जसे की – ती सुकेशला आधीच ओळखते का?, तिला सुकेशची पार्श्वभूमी आधीच माहीत होती का?, सुकेश फसवणूक करून पैसे कमवत होता याची तिला कल्पना होती का? ज्यावर लिपाक्षीने सांगितले की, तिला सुकेशची पार्श्वभूमी आणि फसवणुकीतून कमावलेल्या पैशांबद्दल काहीच माहिती नाही.
ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून खंडणी उकळली होती. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार सुकेशच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे. याप्रकरणी जॅकलिनची अनेकदा चौकशीही झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की जॅकलीन आणि लिपाक्षी यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. मात्र, लिपाक्षीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचली नाही.