सह्याद्रीच्या पट्ट्यात कांदोशी, बिरमणी येथील उंच भागासह खेड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वरून वाहू लागले आहे. या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी खेड बाजारपेठेतील वाल्की गल्लीपर्यंत पोहोचले असून, खेड-दापोली मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालिकेच्या वतीने तीनवेळा भोंगा वाजून शहरवासीयांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र अधूनमधून पावसाच्या सरी पडत असतानाच उत्तर भागातील खेड, दापोली, मंडणगड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या मागील चोवीस तासांत ६७.८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे खेड शहरातील व्यावसायिकांना सतर्क राहण्याचा इशारा पालिका प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.
खेड परिसराबरोबरच सह्याद्रीच्या पट्ट्यातील कांदोशी, बिरमणी या उंच भागातही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत सायंकाळपर्यंत वाढ झाली. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांची पाणीपातळी ६.८० मीटरएवढी झाली होती. दुपारी बारानंतर ७.३० मीटरपर्यंत पोहोचली होती. सायंकाळी त्यात आणखीन वाढ झाली. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचे पाणी खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंगनजीक रस्त्यावर आले. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने बाजारपेठेतील वर्दळीवर परिणाम झाला. जगबुडी नदीची पाणीपातळी सायंकाळी ७वाजता १० मीटरपर्यंत गेली होती. त्यामुळे खेड बाजारपेठेतील निवाचा चौक, गांधी चौक, सफा मस्जिद चौक, वाल्की गल्ली या ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवला.
जगबुडी नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. नारंगी नदीचे पाणी वाढल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. खेडहून दापोली व मंडणगडकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली. खेड-बहिरवली मार्गावरील सुसेरी रस्त्यावर पाणी आल्याने खाडीपट्ट्याकडे जाणारा मार्ग बंद झाला. अतिवृष्टीमुळे वाडी मालदेगावाजवळ दरड कोसळून एसटी बस खोळंबली. परंतु ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून हा रस्ता मोकळा केल्याने एसटी रवाना झाली. यंदाच्या पावसातील हा पहिलाच पूर असला तरीही प्रशासन या परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होते.