तालुक्यातील जयगड-हातखंबा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे महिन्यातून किमान एका निष्पाप नागरिकाचा बळी जात आहे. पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडू. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या रस्त्यावर कोणतीही मालवाहतूक होणार नाही, असा इशारा खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी दिला. त्या संदर्भातील सविस्तर निवेदन प्रांताधिकारी यांना दिले. गेल्या काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे बळी जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
२००५ पासून जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरुवात झाली. सुरुवातीला या दोन्ही पोर्टची व्याप्ती कमी प्रमाणात असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नव्हता; मात्र मागील १० वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीला सुरुवात झाली. तुलनेने रस्ता जसा आहे तसाच आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेगामुळे अपघात होत आहे. यावर प्रशासनाकडून मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची भेट घेऊन नायब तहसीलदार श्रुती सावंत यांच्याकडे निवेदन देण्यात आले. पुढील आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही, उपाययोजना झाली नाही तर या तालुक्यातील जनता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जीव मुठीत घेऊन प्रवास – या आठवड्यात हातखंबामध्ये एक भीषण अपघात झाला. यामध्ये २० वर्षीय तरुणाचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकजण त्यामध्ये जखमी आहेत. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. या रस्त्यावर अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे पाल्यांचे पालक चिंतेत आहेत. अनेकदा या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प असते.