नवीन वर्षाच्या निमित्ताने जम्मूतील वैष्णोदेवी माता मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली. परंतु ती गर्दी एवढ्या प्रमाणात वाढली कि, वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू देखील ओढवल्याची माहिती समोर आली आहे. २० हून अधिक भाविक गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत सुमारे २० जणांना रेस्क्यू केलं आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथील नियंत्रण कक्षाने माहिती दिली आहे कि, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेश येईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तर कटरा येथील रुग्णालयातील बीएमओ डॉक्टर गोपाल दत्त यांनी माहिती दिली कि, सध्या आम्हाला ६ जणांचे मृतदेह मिळाले असून, गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून बाकी तपशील येणे बाकी आहे.
नव्या वर्षाच्या निमित्ताने जम्मूतील वैष्णोदेवी माता मंदिरातून पहिलीच वाईट बातमी आली आहे. मातेच्या दर्शनासाठी याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते आणि यादरम्यान माता वैष्णोदेवी भवनामध्ये गर्दीचा आकडा वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले असून ६ जण आता मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या अपघाताच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर एलजीने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
चेंगराचेंगरीनंतर या यात्रेला स्थगिती देण्यात आली होती, परंतु, आत्ता वैष्णोदेवी मंदिर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. माता वैष्णोदेवी भवनसाठी नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.