ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेटीची प्रतीक्षा आता संपली असून, पर्यटकांचा धोकादायक प्रवास आता थांबणार आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस लाटरोधक भिंत आणि जेटी बांधण्यासाठी ९३ कोटी ५६ लाख रुपयांची निविदा मंजूर झाली असून, या कामाला नवीन वर्षामध्ये सुरुवात होणे अपेक्षित आहे.
जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्यावेळी शिडाच्या बोटी किल्ल्याजवळ पोहोचता तेव्हा प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खातात. यावेळी मोठी कसरत करून पर्यटकांना सुरक्षित बोटीतून उतरावे लागते. यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना तर तारेवरची कसरत करत उतरावे लागते. अनेक वेळा पाण्यात देखील पडण्यासारखे अपघात घडतात. अशा घटना याआधी देखील घडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांमधून देखील ही मागणी जोर धरत होती.
२०१८ च्या एप्रिल महिन्यात नाशिक येथील पर्यटक महिलेने उडी मारल्यामुळे पायाचे हाड मोडण्याची घटना घडली होती. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र तरंगती जेटी बनविण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून होता. आता या जेटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सागरमाला योजनेंतर्गत किल्ल्याच्या पश्चिमेकडे जेटी बनवण्याची परवानगी मिळाली असून, ५०० पर्यटक सुरक्षित उतरतील, अशी भव्य जेटी बनविण्यात येणार आहे. समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी २५० मीटर लांबीची लाटरोधक भिंतही उभारण्यात येणार आहे. यासाठी ९३ कोटी ५६ लाख रुपये अपेक्षित असून, या बांधकामासाठी पुरातत्व विभागाने मंजुरी दिली आहे. जेटीच्या कामाची निविदा निघून ती मंजूर करण्यात आली आहे. नवीन वर्षात कामाला सुरुवात होईल. पुढील दोन वर्षांत जेटीचे काम पूर्ण होईल.