कोकणामध्ये प्रवास करण्यासाठी कोकण रेल्वे सारखा दुसरा कोणताही आरामदायी प्रवास नाही. रेल्वेमुळे कोकण अनेक शहरांशी जोडले गेले आहे. अनेक पर्यटक कोकणाच्या सौंदर्यावर भाळून प्रत्येक सुट्टीमध्ये कोकणयात्रेला येतात. संपूर्ण कोकण हे विविधतेने नटलेले असून अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांची कायमच रीघ असते.
कोकणाचे सौंदर्यमध्ये चार चांद लावण्यासाठी आणि पर्यटन वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन अधिकाधिक रेल्वे गाड्यांमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. दि. १० जून २०२१ रोजी कोकण रेल्वे मार्गावर कायम धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस एक वेगळ्याच रुपामध्ये सुरु करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वेने विस्टाडोम कोचची निर्माती केली आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला शेवटी हा कोच जोडण्यात आला आहे. हि ट्रेन आधी दादर ते मडगाव अशी प्रवास करायची, पण आत्ता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सोडण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद या विस्टाडोम कोचमुळे घेता येणार आहे. विस्टाडोम कोच असलेली हि नवीन एलएचबी प्रकारचे नवे डबे लावलेली जनशताब्दी एक्सप्रेस गुरुवारपासून नियमित धावू लागली आहे.
चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी पहिली पसंती असलेली आणि सुपरफास्ट असलेली जनशताब्दी एक्सप्रेस आता नव्या रूपामध्ये दिसणार आहे. या गाडीच्या डब्यामध्ये बदल करून, आधीचे सर्व जुने डबे बदलून त्या जागी नव्या रुपातले, सुरक्षित आणि वजनाने हलके एलएचबी प्रकारातील नविन डबे जोडण्यात आले आहेत. आणि विशेष आकर्षण असलेला विस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. या विस्टाडोम कोचची रचना मोठ्या काचा असलेल्या खिडक्या, वरती छपरावरही काचा लावण्यात आल्या आहेत. रोटेशन असणार्या खुर्च्यामुळे कोकणच निसर्ग सौंदर्य मनसोक्त न्याहाळता येणार आहे. तसेच सुरक्षेसाठी सेफ्टी अलार्म्स, सामानासाठी कोचच्या सुरुवातीलाच व्यवस्था केली आहे. नव्या रूपातील जनशताब्दी एक्सप्रेस नक्कीच प्रवाशांच्या पसंतीस उतरेल, अशी खात्री मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.