कोकण रेल्वेमार्गावरील विशेष रेल्वेगाड्या आजपासून सुरू झाल्यामुळे चाकरमानी रेल्वेने गावाला येण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची खड्ड्यांमुळे कसरत सुरू आहे. गेली १६ वर्षे मुंबईचे चाकरमानी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याची वाट बघत आहेत. गणेशोत्सव जवळ आला की, दरवर्षी हा महामार्ग पूर्ण होईल, असे आश्वासन दिले जाते; पण प्रत्यक्षात तात्पुरती मलमपट्टी केली जाते. सरकारने सप्टेंबर २०२५ पर्यंत रस्ता खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे; पण सध्याची परिस्थिती पाहता २०२७ पर्यंत महामार्ग खड्डेमुक्त झाला तरी सरकारचे मोठे यश म्हणावे लागेल. कधीतरी महामार्ग पूर्ण होईल आणि आमचा त्रास कमी होईल, या आशेने चाकरमानी सध्याचा त्रास वाचवण्यासाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर-संखेश्वर (कर्नाटक) करत आंबोलीघाटातून सावंतवाडीकडे येत आहेत. काहीजण मुंबई-सातारा-कराड-पाटणमार्गे चिपळूण, अणुस्कुरा घाटातून राजापूर आणि पुढचा प्रवास करत आहेत. आंबाघाट, फोंडाघाट, करूळ घाटातून प्रवास करत चाकरमानी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दाखल होत आहेत.
चिपळूण तालुक्यातील पेढे गावात मागील वर्षी रस्ता कोसळला तेव्हा तात्पुरती उपाययोजना केली होती; पण या ठिकाणचे काम रखडले आहे. परशुराम घाटातील वाहतूकही धोकादायक आहे. मलबा साफ करणे आणि वाहतूक व्यवस्थापनामुळे अनेक समस्या समोर येतात. या घाटातील समस्या कायमच्या निकाली काढण्यासाठी लोणावळा, खंडाळा घाटाच्या धर्तीवरचा ‘व्हाया डक्ट’ पूल परशुराम घाटात उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे हे काम सुरू होऊन पूर्ण होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागेल, हे निश्चित सांगता येत नाही. संगमेश्वर, रत्नागिरी येथील तळेकाटे गावचे बांधकाम रखडले आहे. रस्ता खराब अवस्थेत असल्यामुळे अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे. कशेडी घाटातील बोगदा पूर्ण झाला असला तरी गळती आणि इलेक्ट्रिकल समस्येमुळे बोगद्यात काय होईल, याचा नेम नाही. आंबाघाट आणि इतर भागांत रस्ता खराब, सतत वळणे असून खड्डे तर पाचवीला पुजलेले आहेत.
उद्यापासून गाड्यांना गर्दी – शुक्रवारी आलेल्या विशेष गाड्यांना फारशी गर्दी नव्हती. कारण, शनिवार आणि रविवारी सुटी असते. त्यामुळे शुक्रवारी कामकाज आटपून चाकरमानी रात्रीपासून प्रवास सुरू करतील. त्यामुळे शनिवारपासून चाकरमान्यांची गर्दी वाढणार आहे.