लालपरी’चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर येणार की, नाही याची माहिती मिळेल, अशी आशा प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दाखवली होती. १५ ऑगस्टपासून लाइव्ह लोकेशन अॅप’ सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली; पण प्रत्यक्षात आजपर्यंत हे अॅप सुरू झालेलेच नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या गर्दीत कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा व सामान्य प्रवाशांचा मोठा हिरमोड झाला आहे. एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांत ऑनलाईन आरक्षण, ई-तिकीट यांसारख्या अनेक सुविधा जाहीर केल्या; पण त्या पूर्णक्षमतेने कार्यान्वित नाहीत. लोकेशन अॅप हे त्याचे ताजे उदाहरण आहे. फक्त जाहिरातबाजी करून प्रवाशांची दिशाभूल आणि थट्टा केली जात असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. गणेशोत्सव, दिवाळी, उन्हाळी सुटी अशा हंगामात हजारो बसेस रस्त्यावर धावत असतात.
बस वेळेवर येत नाही, रस्त्याच बंद पडते किंवा नादुरुस्त होते अशावेळी प्रवाशांना काहीच माहिती मिळत नसल्याने तासनतास थांबावे लागते. लोकेशन अॅप सुरू झाल्यास हा त्रास संपेल, अशी मोठी अपेक्षा होती; पण ती कोलमडली आहे. १५ ऑगस्टपासून अॅप सुरू होईल, अशी ठोकताळ्याने घोषणा केली होती; पण आजपर्यंत ते अॅप बंदच आहे. प्रवाशांना खोट्या आशा दाखवणाऱ्या महामंडळाविरोधात संताप व्यक्त होत आहे. ‘बस मिळणे, ती वेळेवर धावणे हीच मोठी कसरत असताना अॅप सुरू करणार म्हणून थट्टा करण्यापेक्षा व्यवस्थापनाने आधी प्रवाशांचा विश्वास जिंकावा,’ अशी टीका चाकरमान्यांनी केली.
दसरा-दिवाळीला तरी सुरू होणार का ? – गणेशोत्सवाची मोठी संधी वाया घालवल्यानंतर आता प्रवाशांचा सवाल सरळ आहे. दसरा-दिवाळीला तरी लोकेशन अॅप सुरू होणार का ? की पुन्हा केवळ घोषणा करून दिशाभूल केली जाणार ?