२२ जुलैची उद्भवलेली भयंकर महापुराची परिस्थितीची आठवण काढता, चिपळूणवासीयांच्या उरात धडकी भरते, अजूनही ते या संकटातून सावरलेले नाही आहेत. पण अशा संकटाच्या काळीच एकमेकांना केलेले सहकार्य कायम लक्षात राहते. त्याही वेळी अचानक उद्भवलेल्या संकटामध्ये अनेक सोयी सुविधांचा असलेला अभाव प्रकर्षाने जाणवला.
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी काक या संस्थेच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यासाठी स्पीड बोट मिळवली आहे. काक या संस्थेच्या माध्यमातून खेर्डी चिपळूण वासियाना स्पीड बोट प्राप्त झाली असून एखादे संकट उद्भवलेच तर भविष्यात नागरिकांना दिलासा मिळेल असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी लोकार्पण सोहळ्याच्या वेळी केले.
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि शासकीय अधिकारी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा स्पीड बोटचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना आम. निकम यांनी २२ जुलैला आलेल्या महापुरामध्ये सुद्धा आपल्या जीवाची परवा न करता, धैर्याने संकटाला सामोरे जाऊन अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या खेर्डी येथील अनेक युवकाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
त्याक्षणी जनतेचे प्राण वाचविणे एवढेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून, उपलब्ध असलेल्या सामानासह मदत कार्य करत असताना रिक्षाचे टप, रिकामे ड्रम, रिकामे प्लास्टिक ड्रम, टायर ट्यूब अशा साधनांचा वापर केला गेला. मात्र काक या संस्थेच्या माध्यमातून खेर्डी चिपळूण वासियाना स्पीड बोट प्राप्त झाली आहे. हा नागरिकांना एक दिलासा असला तरी, अशी संकटाची परिस्थिती यापुढे कधीही उद्भवू नये अशी अपेक्षा आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.