रत्नागिरीला समुद्राची देणगी लाभल्याने येथे मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पावसाळ्याच्या ३ महिन्यामध्ये मासेमारी पूर्णत: बंद असते. मासेमारीचा हंगाम संपायला जेमतेम आठवडा उरला आहे. आणी कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊन मुळे मागील काही महिन्यांपासून मासेमारी व्यवसायाला अपेक्षित असे यश मिळालेले नाही. त्यामुळे स्थानिक मच्छीमार उदरनिर्वाहासाठी समुद्रात मासेमारी करायला जातात. रत्नागिरीमधील काळबादेवी गावामध्ये एका मच्छिमार्याला १०० ते २०० किलो वजनाची बंपर वाघळी मिळाली आहे.
रत्नागिरीमध्ये विविध प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये वाघळी हा मासा सुद्धा प्रसिद्ध आहे. काळबादेवी मधील एक मच्छीमार सकाळी मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये काही अंतरावर गेला असता, काही प्रमाणात लहान मोठे मासे पकडून परत येत असताना, शेवटच जाळ टाकावं आणि घरी परतावं असा विचार करून जाळ टाकले. नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते वादळामुळे समुद्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उलथापालथ घडली. मासे खोल समुद्रात गेल्याने काठावर किंवा काही अंतरावर मासळी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जे मिळेल त्यावर समाधान मानून संदेश मयेकर हा मच्छीमार माघारी परतत होता. अचानक जाळे जड जाणवू लागल्याने जाळे ओढून पाहता त्यामध्ये मोठी वाघळी मिळाल्याचे निदर्शनास आले. एवढी मोठी वाघळी रत्नागिरीच्या किनारपट्टीवर प्रथमच मिळाल्याचे बोलले जात आहे. साधारण दीडशे ते दोनशे किलोच्या आसपास या वाघळीचे वजन होते. साधारण तिची विक्री किंमत वीस हजारच्या जवळपास होती परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे गिर्हाईकांची कमतरता जाणवत असल्याने योग्य तसा भाव न मिळाल्याचे मयेकर यांनी सांगितले. तरीसुद्धा सकाळचं एवढी मोठी वाघळी जाळ्यात सापडल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ग्रामस्थही एवढ्या बम्पर वाघळीची झलक बघायला किनार्यावर जमले होते.