कोकण किनारपट्टीवर अनेक किनारपट्टी भागात ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण अधिक वाढले असून, हि कासवं एका किनाऱ्यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, ती कशाप्रकारे कोठून कुठे प्रवास करतात, याचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठान मार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर येथील किनार्यांवरून पाच कासवे सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आली. काही महिने त्यांच्या नोंदीही घेतल्या जात आहेत.
पण कालांतराने त्यातील ४ ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटला असून, या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या पाचपैकी सध्या केवळ वनश्री हे एकमेव कासव संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वी रेवाचा संपर्क तुटला. संपर्काबाहेर गेलेले रेवा हे चौथे कासव असून, मागील सहा महिन्यातील निरीक्षणांवरून या कासवांचे कायम वास्तव्य हे अरबी समुद्रामध्येच असावे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच ती समुद्र किनाऱ्यालागतच वावरत असून, खोल समुद्रात प्रवास करत नसावीत, या अंदाजाला देखील पुष्टी मिळाल्याचे अभ्यासक सांगत आहेत.
सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या ५ ऑलिव्ह रिडले कासवांपैकी काही कालावधीतच लक्ष्मी कासवाचा संपर्क तुटला. त्यानंतर प्रथमा आणि सावनी संपर्काबाहेर गेली. प्रथमाने गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत प्रवास केला होता. पावसाळा तोंडावर आल्यानंतर सर्वच कासवांचा प्रवास दक्षिण किनाऱ्याकडे सुरू झाला होता. जून महिन्याच्या अखेरीस रेवाचा संपर्क तुटला. ते फेब्रुवारीच्या दरम्यान गुहागर येथून टॅग करून सोडण्यात आले होते. ट्रान्समीटरमधील बिघाडामुळेच ती संपर्काबाहेर गेल्याचे अभ्यासकांचे मत आहे. कांदळवन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेवाने २ हजार ३२८ किलोमीटर अंतर पार केले असून, ते कारवार- कर्नाटकच्या किनाऱ्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर शेवटचे निदर्शनास आले होते.

