ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. लहान मोठ्या वयाच्या सर्वांचीच अशा प्रकारे फसवणूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी असे व्यवहार करताना विशेष सावधता बाळगण्याची आवश्यकता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कणकवलीमधील तरुणाला अडीच लाखांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार २ जून ते २ जुलै या दरम्यान घडला.
शेअर मार्केट म्हणजे कमी वेळात भरपूर पैसा अशी सध्याच्या तरुणाईचे मत बनले आहे. कणकवली तालुक्यात नोकरी करत असणाऱ्या तरुणाला संशयित शेअर मार्केट एजंट आशिष धीर याने जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपर्क साधला होता. त्याने संभाषण करताना सुद्धा तरुणाशी मराठीतून केले आणि त्याचा विश्वास संपादन केले. आपण शेअर मार्केटमध्ये काम करत असून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूकीबाबतीत त्याला संपूर्ण माहिती दिली. आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने भरघोस नफा मिळतो, असे त्याला सांगण्यात आले.
संशयित धीरने पाच-सहा दिवसाच्या कालावधीने पुन्हा एकदा त्या तरुणाला संपर्क साधून गुंतवणूक करणार आहात का, असे विचारले व शेअर मार्केटसाठी आवश्यक असणारे डिमॅट अकाउंट सुरू करण्याची विनंती केली. तरुणाने डिमॅट अकाउंट सुरू करुन प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे काही शेअर्सची खरेदी केली. या शेअरच्या बदल्यात शेअर मार्केटच्या वर खाली होण्याने तरुणाला दहा-पंधरा हजार रुपये तत्काळ प्राप्त झाले. झटपट पैसा मिळत असल्याने त्या तरुणाने आपली गुंतवणूक हळूहळू वाढवली.
परतावा चांगला मिळत असल्याचे दिसून आल्याने, जून अखेरीस त्या तरुणाने जवळपास दोन ते अडीच लाखापर्यंत गुंतवणूक केली. सुरुवातीचे थोडे दिवस त्याला लगेचच परतावा मिळत गेला. परंतु, नंतर मात्र तो मिळणे हळूहळू बंद झाला. त्यामुळे त्याने त्या शेअर मार्केट एजंटाशी संपर्क साधला व आपल्याला येत असलेली समस्या सांगितली. परंतु, या एजंटने याबाबत विशेष काहीच प्रतिक्रिया दिली नाही, काहीतरी थातूरमातुर उत्तरे दिली. एक-दोन दिवसाच्या कालावधीनंतर त्यांनी फारसा संपर्कही न ठेवल्याने आपली फसवणूक झाल्याचे या तरुणाच्या लक्षात आले.
या प्रकरणी संबंधित फसवणूक झालेल्या तरुणाने येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आशिष धीर रा. मुंबई याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता ही फिर्याद जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग केली जाणार आहे. त्यानंतरच या प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू होणार आहे.