23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKokanवन खात्याचा कर्म दरिद्रीपणा! इर्शाळवाडीचे ग्रामस्थ जीवाला मुकले

वन खात्याचा कर्म दरिद्रीपणा! इर्शाळवाडीचे ग्रामस्थ जीवाला मुकले

वनविभागाने थोडी जरी सहानुभूती दाखवली असती, पावसाळ्यापुरते सहकार्य केले असते तर आज आमच्यातील अनेकांचे जीव वाचले असते.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री दुःखाचा डोंगर कोसळला. धो-धो पावसातच भली मोठी अजस्त्र दरड कोसळली आणि अख्खं गाव त्याखाली गाडलं गेलं. या दुर्घटनेत आजपावेतो २१ जणांचा मृत्यू ओढवला असून मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरड कोसळल्याने ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याचे सांगितले जात असले तरी वन विभागाने थोडी जरी माणुसकी दाखवली असती तर या गोरगरीब आदिवासी बांधवांचे प्राण वाचले असते, अशी धक्कादायक माहिती हाती येते आहे. वनखात्याच्या कर्म दरिद्रीपणामुळे बिचारे गोरगरीब ग्रामस्थ जीवाला मुकले, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या गावात राहणाऱ्या अनेक कुटुंबांनी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन आपल्या घरांना कुलूप ठोकून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आणि दरडीपासून दूर असलेल्या नम्राचीवाडी या आदिवासीपाड्यावर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यासाठी त्यांनी तेथील वनजमिनीवर तात्पुरत्या झोपड्याही बांधल्या होत्या. मात्र वनविभागाने या झोपड्या तोडल्या. एकदा नव्हे तर दोन वेळा हा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. मात्र दोन्ही वेळा वनविभागाने झोपड्या तोडल्या. नाईलाजाने हे गावकरी पुन्हा इर्शाळवाडी आणि ही दुर्घटना घडली. त्यामुळ ही जरी नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शासकीय यंत्रणेच्या असंवेदनशील अशा भूमिकेमुळेच या लोकांचे जीव गेल्याचा आरोप संकटात सापडलेल्या इर्शाळवाडीतील अनेक तरूणांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. अतिशय दुर्गम अशा भौगोलिक परिस्थितीत इर्शाळवाडी हे गाव वसले आहे. आदिवासी समाजातील बांधव या गावात राहतात.

इर्शाळवाडीत ४९ घरे आहेत. बुधवारी रात्री धो धो पाऊस पडत असतानाच अजस्त्र डोंगरातून आक्राळ-विक्राळ अशी दरड कोसळली. या दरडीखाली ४९ घरांपैकी मधल्या भागात असलेली ७ ते ८ घरे वगळता उर्वरित सर्व घरे दबली गेली, कोसळलेल्या डोंगराच्या माती आणि दरडीमध्ये शेकडो लोकं गाडली गेली आहेत. बचावपथके आपल्या जीवाची बाजी लावत गुरूवारी पहाटे अनंत अडचणींवर मात करत गावात पोहोचली. त्यांनी ढिगारा उपसण्यास सुरूवात केली. कोणत्याही यंत्राशिवाय केवळ हाताच्या सहाय्याने सुरू असलेल्या या बचाव मोहिमेमध्ये एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि काही स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक है सहभागी झाले आहेत.

शेकडोंना वाचविले – गुरूवारी दिवसभर हे बचाव आणि शोधकार्य सुरू होते. शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. त्यातील १६ जणांचे मृतदेह गुरूवारी सायंकाळपर्यंत बाहेर काढण्यात यश मिळाले. तर १०३ जणांना वाचविण्यात देखील यश आले. मात्र अंधार, पसरलेले चिखलाचे साम्राज्य आणि धुक्यामुळे कमी झालेली दुष्यमानता यामुळे धो- धो पावसात सुरू असलेले शोधकार्य सायंकाळी थांबविण्यात आले.

मृतांची संख्या २१ वर – शुक्रवारी सकाळी ६.३० वा हे शोधकार्य पुन्हा सुरू झाले. शुक्रवारी दिवसभरात आणखी ५ मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले असल्यामुळे मृतांचा आकडा २१ वर पोहोचला आहे. अजूनही वाडीतील. शेकडो लोकं बेपत्ता आहेत. ते याच ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. मदत पथकं ढिगारा उपसत त्यांचा शोध घेत आहेत. मात्र आता या ढिगाऱ्याखाली आता कोणी जिवंत असेल तर तो देवाचा चमत्कारच मानावा लागेल, असा अंदाज तेथील भीषण परिस्थिती पाहता अनेकांचा असला तरीही बचाव पथकं पूर्ण क्षमतेने मलबा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नातेवाईकांचा आक्रोश – ज्यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही त्यांचे नातेवाईक ढसाढसा रडत आहेत. त्यांच्या आक्रोशाने तेथे मदतकार्यात गुंतलेल्यांच्या अंगावरही भीतीने काटा उठत आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या आक्रोशाने एका निर्धाराने अनंत अडचणींवर मात ‘करत कुदळ, फावड्याच्या आधारावर मलबा उपसणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांचे डोळेही पाणावलेले दिसत आहेत.

धक्कादायक माहिती अतिशय – दुर्गम परिस्थितीत वसलेल्या या गावात शुक्रवारी २-३ तासांची पायपीट करत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीदेखील पोहोचले आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना गावातील काही तरूणांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

स्थलांतराचा निर्णय – एका तरुणाने सांगितले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी संभाव्य धोका लक्षात घेऊन इर्शाळवाडी गावाच्या खाली बऱ्यापैकी सोयीसुविधा असलेल्या नम्राचीवाडी या गावामध्ये जाऊन राहण्याचा निर्णय इर्शाळवाडीतील अनेकांनी घेतला होता. नम्राचीवाडी गावातील गावकऱ्यांनी देखील त्यांना अनुमती दिली होती. त्यानंतर पावसाळ्यापुरते तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, नम्राचीवाडीमध्ये वनजमिनींवर अनेकांनी झोपड्या बांधल्या होत्या. सामानसुमान हलविण्याचे काम सुरू असतानाच वन विभागाने या झोपड्यांना आक्षेप घेतला, बेकायदेशीर झोपड्या बांधून तुम्हाला राहता येणार नाही असे ठणकावून सांगत तरूणांनी उभारलेल्या झोपड्या वनविभागाने तोडल्या, असा आरोप एका तरूणाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शुक्रवारी केला.

हातापाया पडलो – ‘ही आम्हालाही वनजमीन आहे माहिती हे आहे… आम्ही वारंवार विनंती केली… पावसाळ्यापुरते राहू द्या… त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या गावी जावून राहू, स्वत:च या झोपड्या आम्ही पाडू, परंतु आत्ता पावसाळ्यापुरती सोय करू द्या… अशी विनंती केली. हातापाया पडलो. मात्र साहेबांनी ऐकले नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही पुन्हा इर्शाळवाडीमध्ये येऊन आम्ही आमच्या घरात येऊन राहिलो. शेवटी जी भीती वाटत होती तीच खरी ठरली. बुधवारी रात्री महाविशाल दरड कोसळली आणि आम्ही आमचे नातेवाईक गमावले… मोडकी तोडकी घरे उद्ध्वस्त झाली… ऐन पावसाळ्यात आमचे संसार उघड्यावर पडले आहेत. आता आम्ही कुठे रहायचे? वनविभागाने थोडी जरी सहानुभूती दाखवली असती, पावसाळ्यापुरते सहकार्य केले असते तर आज आमच्यातील अनेकांचे जीव वाचले असते’, असे हे तरूण सांगत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular