कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात दसरा मेळाव्यात सहभागी झालेले काही लोक जुन्या मदरशात घुसले. येथे या लोकांनी घोषणाबाजी केली आणि मदरशाच्या एका कोपऱ्यात पूजाही केली. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४ आरोपी पकडले गेले आहेत, तर ५ आरोपी अद्याप फरार आहेत. त्याचबरोबर गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
इस. १४६० मध्ये बांधलेला, हा मदरसा एक हेरिटेज इमारत आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे त्याची देखभाल केली जाते. पूर्वी मदरशाच्या आत एक जुने लक्ष्मी मंदिर होते. त्या मंदिरात नवरात्रीच्या काळात ४-५ लोक पूजेसाठी जात असत. नंतर ते मंदिर पाडण्यात आले.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यातील भाजप सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देऊन मुस्लिमांना अपमानित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महमूद गवान नावाचा हा मदरसा १४६० मध्ये बांधण्यात आला होता. हा मदरसा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत येतो. देशातील महत्त्वाच्या वास्तूंच्या यादीत या वास्तूचाही समावेश आहे.
बुधवारी सायंकाळी या जमावाने मदरशाचे कुलूप तोडल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर मदरशाच्या पायऱ्यांवर उभे राहून त्यांनी जय श्री राम आणि हिंदु धर्म जयच्या घोषणा दिल्या, त्यानंतर मदरशाच्या एका कोपऱ्यात उभे राहून पूजाही केली. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये जमाव पायऱ्यांवर उभे राहून मदरशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
बिदरमधील अनेक मुस्लिम संघटनांनी या घटनेचा निषेध करत निदर्शने केली. आरोपींना अटक करावी, अशी संघटनांची मागणी आहे. तसे न केल्यास शुक्रवारी नमाजानंतर मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जातील. निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.