हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकमधील आंब्याची विक्री करणाऱ्या आंबा विक्रेते आणि आंबा उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये बुधवारी बाजारात बाचाबाची झाल्याचे चित्र पहायला मिळाले. ‘तुम्हाला जर कर्नाटकमधील आंबा विकायचा असेल तर तसा बोर्ड लावून विका परंतु हापूसचा आंबा सांगून कर्नाटकचा आंबा विकलात तर तो आंबा बॉक्समध्ये भरून कर्नाटकमध्ये पाठवून देऊ, असा सणसणीत दम आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी येथे आंबा विक्री करणाऱ्यांना भरला. हापूसच्या नावाखाली सर्रास कर्नाटकमधील किंवा अन्य ठिकाणच्या आंब्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे संतापाचे वातावरण होते. मंगळवारी राजापुरात आंबा उत्पादक शेतकरी एकत्रित आले आणि त्यांनी हापूस आंबा बदनाम करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी रत्नागिरीमधील आंबा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. अन्य आंब्यांची विक्री तत्काळ थांबवावी असा इशारा त्यांनी विक्रेत्यांना दिला. हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा हापूस आंबा म्हणून विकत असल्याचे हापूस आंब्याला दर मिळत नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
‘तुम्हाला कर्नाटकचा आंबा विकायचा असेल तर तो त्याच नावाने विका, तसा फलक लावा, हापूस आंबा म्हणून विकू नका’ असे या विक्रेत्यांना स्थानिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले.आंबा उत्पादक संघटनेचे नेते बावा साळवी, प्रशांत सावंत, चिन्मय घवाळी, प्रदीप सावंत, सुशांत सावंत, राजू पेडणेकर आदी अनेक आंबा उत्पादक शेतकरी रत्नागिरी शहरातील धमालणीचा पार परिसरात जेथे आंबा विक्री होते तेथे दाखल झाले. यावेळी हापूस आंबा मिळेल असे फलक लावलेले आढळले. मात्र प्रत्यक्षात कर्नाटकचा आंबा विकला जात होता. ते पाहून स्थानिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा पारा चढला. त्यांतून बाचाबाची झाली. कर्नाटकचा हापूस विकायचा असेल तर तसा फलक लावा. मात्र हापूसचा आंबा सांगून अन्य आंबा विकू देणार नाही असे या शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले. ही फसवणूक तत्काळ थांबवा अन्यथा आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागेल, असेदेखील बजावण्यात आले.दरम्यान, अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांविरोधात शासकीय यंत्रणा काय करते? असा सवालही उपस्थित होत आहे.