रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथे काही वर्षापूर्वी नळपाणी योजना ही १० टक्के लोकवर्गणी मधून मंजुर होणार होती व त्यासाठी तेथील नागरिकांनी ५००० रुपये एवढी रक्कम ग्रामपंचायतीकड़े जमा केले होते. ती रक्कम साधारण १३ ते १४ लाख रुपये ग्रामपंचायतकडे वेगळ्या अकाउंटमध्ये जमा आहे असे समजते. परंतु ३ वर्षापूर्वी २.२५ कोटींची योजना लोकवर्गणी शिवाय मंजुर केल्यामुळे वरिल रक्कम ग्रा.प. कडे तशीच पडून आहे व ती रक्कम लोकांना परत कशी दयायची याबाबत सरपंच सौ.मंजिरी पाडळकर यानी ज़िल्हा परिषदेकडे मार्गदर्शनपर माहिती मागवली आहे.
परंतु कारवांचीवाडी येथे सध्या एक बोर्ड लावण्यात आला आहे, त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामध्ये रक्कम उपसमितीकडे जमा करणेसाठी मुळ पावतीसह, संमत्तिपत्र जमा करण्याचे काम बेकायदेशिररित्या सुरु आहे. शासनाने सर्व समित्या २०१९ ला रद्द केलेल्या असताना ही समिती सरपंच किवा ग्रामपंचायत यांचे मागणी शिवाय कोणाच्या आदेशाने करत आहे? त्याच बरोबर ही समिती ज्या कारणासाठी पैसे स्वतःकडे घेऊ पहात आहे ते कारण म्हणजे नळ कनेक्शन, ही ६०० कनेक्शन केंद्र सरकारच्या जलजीवन कार्यक्रमाअंतर्गत मोफत देण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतकडे त्यासाठी केंद्र शासनाकडुन निधी जमा आहे. सरपंच सौ.मंजिरी पाडळकर यानी अशी कोणतीही रक्कम समितीकडे जमा करणार नसुन ती वैयक्तिक खात्यात जमा करणार असल्याचे सांगितले. त्यात अजून भर म्हणजे, ही समिती ज्यानी पूर्वी ५००० रुपये दिले नाहीत त्यांचे कडुन १०,००० हज़ार रुपये जमा करुन घेणार आहे. १०-१५ जणानी ही रक्कमही जमा करण्याची तयारी दर्शवून फ़ॉर्म नेल्याचे समजते. ज्या समितीच्या नावे बँकमधे अकाउंट आहे, त्या समितीचे अध्यक्ष यांचे निधन झाले आहे तरिही हे सुरु आहे. याची चौकशी व्हावी याकरिता सीईओ यांची भेट घेणार असल्याचे सतेज नलावडे यांनी म्हटले आहे.
या सर्वाचा विचार करुन भाजपा तर्फे सतेज नलावडे, रोहन वारेकर, दीपक आपटे, लखन पावसकर, ,नितिश आपकरे व वैभव गराटे यानी कारवांचीवाडीतील ग्रामस्थांना असे आवाहन केले आहे की ग्रामपंचायतीकड़े खात्री करुनच मग कोणतेही कागद अगर रक्कम जमा करण्याचे आवाहन केले आहे.