कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सव, शिमगोत्सव, उन्हाळी सुटीसह इतर हंगामाच्या कालावधीत चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचे तिकीटदर नियमित गाड्यांच्या तिकीटदरापेक्षा जास्त असतात. काही स्थानकांदरम्यान दर दुपटीपेक्षा जास्त असतो. या प्रश्नी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधत कोकण मार्गावर विशेष गाड्या चालवताना प्रवाशांना परवडेल, अशा प्रकारचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. २०१५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, या गाड्यांचे तिकीटदर आकारले जातात. या नियमावलीनुसार, विशेष गाड्यांना तिकीटदरांव्यतिरिक्त सेकंड क्लास-श्रेणीसाठी १० टक्के तर इतर श्रेणीकरिता ३० टक्के अतिरिक्त दर आकारले जातात.
अतिरिक्त तिकीटदर आकारण्याची किमान आणि कमाल मर्यादा विचारात घेणे आवश्यक आहे. मुंबई ते माणगाव किंवा खेड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्लीपर डब्याच्या श्रेणीतून प्रवास करण्यासाठी ५०० किमी प्रवासाचे पैसे मोजावे लागतात. कमी अंतराच्या प्रवासासाठी विशेष गाड्यांचा तिकीटदर दुप्पटीपेक्षा जास्त असतो. सेकंड सीटिंग आणि एसी चेअर कार या किमान अंतरासाठी अनुक्रमे १०० आणि २५० एवढे आहे. यामुळे कमी अंतरासाठी विशेष गाड्यांच्या तिकीटदरात नियमित गाड्यांच्या तिकीटदरामध्ये मोठा फरक नसतो. मुंबई ते खेड, चिपळूण, रत्नागिरीसाठी स्लीपर क्लास न चालवता सेकंड सीटिंग आणि एसी चेअर कार या श्रेणीचे डबे असलेल्या गाड्या चालवाव्यात, अशी विनंती जयवंत दरेकर यांनी केली आहे.