25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeDapoliमित्रपक्षांची साथ ठरणार कळीचा मुद्दा - दापोली मतदारसंघ

मित्रपक्षांची साथ ठरणार कळीचा मुद्दा – दापोली मतदारसंघ

दापोली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार हा लक्षवेधीच ठरणार आहे.

दापोली विधानसभा मतदरासंघातील लढत राज्यातील मोठ्या लक्षवेधी लढतींपैकी एक मानली जात आहे. या निवडणुकीत दोन शिवसेना समोरासमोर उभ्या आहेत. विकास कामांसाठी आणलेला निधी, लाडकी बहीण योजना, सहानुभूती, बेरोजगारी, शिक्षण, पर्यटन हे मुद्दे या निवडणुकीत प्रकर्षाने मांडले जाणार आहेत. तसेच मित्रपक्षांची साथ हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. मागील दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत दापोली मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी राज्याचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने आताची निवडणूक निश्चितच महत्वपूर्ण व लक्षवेधी असल्याचा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार योगेश कदम हे रिंगणात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय कदम यांनी प्रस्थापितांच्या विरोधात आव्हान उभे केले आहे. सत्तासंघर्ष, पक्षांतर्गत फूट यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. सत्ता संघर्षाच्या पेचप्रसंगाचा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात प्रभाव पहायला मिळाला.

काही काळ कार्यकर्ते विचलित झाले होते. त्यानंतर मतदारसंघातील घडामोडींमध्ये माजी आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादीतून घरवापसी करत शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून लौकिक असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेची विभागणी झाली. या दरम्यान दोन्ही प्रबळ दावेदारांनी आपापला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे सध्या कोणाचे किती वर्चस्व, हे सांगणे कठीण आहे. दोन्ही उमेदवारांकडून नव्याने मांडणी केली आहे. दोन्हीकडील आघाड्यांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आव्हान नक्कीच राहणार आहे. सध्यातरी दोन्ही प्रबळ दावेदार तुल्यबळ असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकणारे मुद्दे या निवडणुकीत नक्की पहायला मिळतील. त्यामुळे राज्य व स्थानिक स्तरावरील विविध मुद्दे या निवडणुकीत नक्कीच प्रभाव टाकतील. विकास, लाडकी बहीण योजना, सहानुभूती, बेरोजगारी, शिक्षण, पर्यटन याशिवाय अनेक मुद्दे या निवडणुकीत प्रकर्षाने पहायला मिळू शकतात.

निवडणुकीत मित्रपक्षांची साथ हा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा ठरू शकतो. शिंदे शिवसेनेकडून भाजपची तर ठाकरे सेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. दापोली नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करुन ठाकरे शिवसेनेकडे वळल्याचा फटका शिंदे शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे मित्र पक्षांची ताकद दोन्ही सेनेच्या उमेदवारांसाठी महत्वाची ठरणार आहे.

स्टार प्रचारकांच्या सभांवर भर – प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रबळ दावेदारांनी गावभेटीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसले. आमदार योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांच्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. तर संजय कदम यांनी गनिमी काव्याचा वापर करत यावेळी कार्यकर्त्यांसमवेत अर्ज दाखल केला. आगामी काही दिवसात दोन्ही बाजूने स्टार प्रचारकांच्या उपस्थितीत प्रचारसभा होतील. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार हा लक्षवेधीच ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular