दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांना रसद पुरवण्याच्या हेतूने खैर विक्री करणाऱ्या सहा जणांना एटीएसने ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सावर्डेतील तरुणाचा समावेश असल्याने येथील पोलिस यंत्रणेने याविषयीची तत्काळ चौकशी सुरू केली आहे. तसेच याप्रकरणी जप्त केलेला सुमारे १० लाख ८ हजारांचा २४ टन खैर नेमका आणला कोठून याबाबतही वनविभागमार्फत तपास सुरू केला आहे. दहशतवादविरोधी पथकाने दोन दिवसांच्या कारवाईनंतर सहा जणांना मुंबई येथे नेले आहे. मात्र त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन (७८, इस्लामपूर, सध्या रा. भिवंडी), असिफ रशिद शेख (नगरसल, नाशिक), फारुख शेरखान पठाण (येवला रोड, नाशिक), शाहनवाज प्यारेजन (चिक्कबळ्ळापूर, कर्नाटक), इर्शाद युसूफ शेख (संगमनेर, अहमदनगर), मुआज रियाज पाटणकर (४२, सावर्डे, चिपळूण) या सहा जणांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्यावर २४ टन वजनाचा १० लाख ८ हजार रुपये किमतीचा खैर लाकडाचा साठा बेकायदेशीर साठवून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद नवी मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विनायक काशिनाथ नरवणे यांनी दिली आहे.
सावर्डे येथे दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी उशिरा कारवाई केली. अटकेतील सहा जणांपैकी एकाचा इसिस या दहशतवादी संस्थेसोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इसिसच्या मध्य प्रदेशातील रतलाम येथील ‘अल सुफा मॉडेल’मधील जुलै २०२३ मध्ये अटक करण्यात आलेला संशयित आकिफ नाचण (बोरिवली पडघा, ठाणे) याच्याशी वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन याच्याशी जवळीक असल्याचे तपासात उघडकीस आले होते. याबाबत तपासात वसीम मोमीन हा बेकायदेशीरपणे खैराच्या लाकडांची चोरून वाहतूक करत होता. त्या लाकडाची खरेदी-विक्री करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवायचा आणि ते पैसे तो देश विघातक कृत्य करणाऱ्या काही धार्मिक कट्टरवादी व्यक्ती आणि संघटनांना देत असल्याचे समोर आले होते.
त्याप्रमाणे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर दहशतवाद विरोधी पथकाने लक्ष ठेवले होते. कर्नाटकमधून या टोळीने चोरट्या पद्धतीने आणलेला खैराचा साठा सावर्डेत लपवला होता. दहशत विरोधी पथकाने पंच, वनाधिकारी यांनी बुधवारी छापा टाकला. यामध्ये दहिवली गावात एकाशेडच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर हा लाकूड साठा आढळला. ही जागा पाटणकर यांने भाड्याने घेतली होती. छाप्यावेळी पोलिस पथकासोबत संबंधित जागामालक देखील उपस्थित होता. यावेळी दहशतविरोधी पथकाला निळ्या प्लास्टिकच्या कागदाखाली २४ टन खैर साठा मिळाला.
कर्नाटकातून खरेदी – हा लाकूडसाठा कर्नाटकातील त्यांच्या ओळखीचा व्यापारी शहानवाज प्यारेजान याच्याकडून वसीम मोमीन यांनी ६ ऑक्टोबरला खरेदी केले. आसिफ रशीद शेख याच्या मालकीच्या ट्रकमध्ये भरून चालक इर्शाद शेख याने ते सावर्डे येथे आणला. या ट्रकच्या मागे पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून वसीम मोमीन, शहानवाज प्यारेजन, असिफ मोहम्मद शेख, फारुख शेरखान पठाण हे सर्वजण सावर्डे येथे आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पातळीवर सावर्डे पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे.