रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास जयगड येथील जिंदाल कंपनीच्या जेटीवरुन भरधाव वेगाने एक बल्गर जात होता. तर कोळीसरे येथील माजी सैनिक रामचंद्र देमाजी सावंत हे आपल्या ऍक्टिव्हा दुचाकी गाडीने कोळीसरे ते खंडाळा या ठिकाणी आपल्या खासगी कामा निमित्त जात होते. खंडाळा येथील महावितरण कार्यालयाजवळ ते आले असता, त्यांच्या दुचाकीला बल्गरने मागून इतक्या जोराने धडक दिली कि, दुचाकीवर मागे बसलेला त्यांच्या नातू दर्शिल प्रमोद सावंत या चिमुरड्याचा उडून रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू ओढवला तर आजोबा रामचंद्र सावंत हेसुद्धा जखमी झाले आहेत.
बल्गर आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दहा वर्षीय चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बल्गरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालविणारे आजोबा देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ अतिशय आक्रमक झाले असून त्यांनी जिंदाल कंपनीच्या अवजड आणि बेशिस्तपणे करण्यात येणाऱ्या वाहतुकीला आक्षेप घेत रस्तारोको केला आहे. सध्या खंडाळा परिसरात एकदम तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार या अपघाताची माहिती मिळताच कोळीसरेसह संपूर्ण खंडाळा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात एकवटले होते. त्यांनी रास्तारोको करून जिंदाल कंपनीच्या सर्व अवजड वाहनांना थांबविण्याची विनंती करून यापुढे एकही वाहन आम्ही पुढे जाऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सुद्धा जादाची कुमक मागवून घेतली आहे.