सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईसह राज्यभरातून आलेल्या काही पर्यटकांनी संगमेश्वरमध्ये हॉटेल मालकाला मारहाण केली. तर खेडमध्ये मॅनेजरला चोपल्याच्या घटना सोमवारी उघड झाल्या असतानाच मुंबईतून आलेल्या महिलांनी कुडाळमध्ये एका स्थानिक व्यापाऱ्याला बेदम चोपल्याने अशा धुडगूस घालणाऱ्या पर्यटकांविषयी संतापाची लाट उसळली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत यासाठी जिल्हाभर जल्लोष सुरू असतानाच कुडाळमध्ये मुंबईहून आलेल्या महिलांनी दादागिरी करत स्थानिक व्यापाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार कुडाळमध्ये मंगळवारी घडला आहे. मुंबईहून आलेले पर्यटक त्यांची गाडी कुडाळ शहरातील एका रस्त्यावर लावत असताना कारची दुचाकींना धडक बसली आणि दुचाकी खाली पडल्या. याचा जाब विचारण्यासाठी कुडाळमधील एक स्थानिक व्यापारी गेला असता त्यालाच कारमधील महिलांनी मारहाण केली. व्यापाऱ्याला मारहाण होताच शहरातील अनेक व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी पोलीस स्थानकावर धडक दिली.
महिलांनी चोपले – ५ मंगळवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास कुडाळ शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला पार्क दुचाकी कारच्या धडकेत खाली पडल्या. दरम्यान येथे दुकान असलेल्या एका व्यापारी युवकाने त्याची दुचाकी पडली म्हणून याबाबत कार चालकाला विचारणा केली असता संबंधित कार चालकाच्या गाडीत बसलेल्या महिलांनी या युवकालाच बेदम मारहाण केली.
त्यानंतर अशा प्रकारची मारहाण तुम्ही का करताय? शिवीगाळ का – करताय? अशी विचारणा काही कुडाळातील व्यापारी तसेच युवक करत असताना पुन्हा एकदा त्या महिलांनी एका युवकास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दरम्यान काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दोन्ही बाजूकडील लोकांना पोलिसांनी पोलीस स्थानकात नेले. मुंबईकरांच्या या दादागिरीच्या विरोधात कुडाळातील व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकजूट होत कुडाळ पोलीस ठाण्यात जमले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
स्थानिक महिला पोलीस ठाण्यात घुसल्या – पार्किंग करताना मुंबईकर महिलांच्या कारच्या धडकेत स्थानिक व्यापाऱ्याची दुचाकी खाली पडली. याचा जाब विचारल्याने चाकरमानी माहिलांनी स्थानिक व्यापाऱ्यालाच मारहाण केली. कुडाळमध्ये भर रहदारीच्या रस्त्यावर जोरदार राडा झाला. रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठी हातात घेतली. पार्किंगचा वाद शिगेला पोहोचल्याने मारहाण झालेला स्थानिक व्यापारी अन्य एक तरुण व मुंबईकर महिला यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर असंख्य महिला आणि स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्ते पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखले. यावेळी सहाय्यक जिल्हा पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी संवाद साधत शांत रहाण्याचे आवाहन केले. तसेच संबंधितांवर तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र जमाव रात्री उशीरापर्यंत हलण्यास तयार नव्हता.