27.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKokanमांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या भीतीपोटी पळालेल्या ३ मुलींना खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मंगळवारी दुपारी खेड रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस थांबवून ताब्यात घेतले. या तिन्ही मुली सुखरूप आहेत. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाकडून खेड पोलिसांना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ मुलींचे अपहरण झाल्याचा संदेश देण्यात आला होता. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून या ३ मुली प्रवास करत असून त्यांचा शोध घेण्याचे आदेश खेड पोलिसांना देण्यात आले. या मुलींच्या पालकांनी त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार काशिमीरा पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्याआधारे तेथील पोलिसांनी खेड पोलिसांशी संपर्क साधला होता. मेसेज मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत चर्चा केली. २ पोलीस अधिकारी आणि ८ अंमलदार यांचे एक पथक या मुलींच्या शोधासाठी स्थापन करण्यात आले. मांडवी एक्सप्रेसमधून त्या येत असल्याची खबर मिळाल्याने पोलीस पथक खेड रेल्वेस्थानकावर पोहोचले होते.

दुपारी १२.०५ वाजता मांडवी एक्सप्रेसचे खेड रेल्वेस्थानकात आगमन झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी ही गाडी थांबवली. नेहमीच्या वेळेपेक्षा ५ मिनिटे अधिक वेळ गाडी थांबविण्यात आली. शिमगा सुरू असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्याचबरोबर मांडवी एक्सप्रेसमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीतून मार्ग काढत रेल्वेच्या बोगीमध्ये बसलेल्या या ३ मुलींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस पथकाने गाडीचा कसून शोध घेतला आणि त्या तिन्ही मुली सापडल्या. त्या सुखरूप होत्या. त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या तिघीनाही खेड पोलीस स्थानकात आणले आणि त्यांची चौकशी केली.

या मुलींनी दिलेल्या माहितीनुसार तिघीही घराजवळच असलेल्या गार्डनमध्ये फिरायला गेल्या होत्या. मात्र त्यांना तेथे उशीर झाला. त्यामुळे आता आपल्याला पालक ओरडतील या भीतीपोटी त्यांनी थेट मांडवी एक्सप्रेस गाठली असे या मुलींनी सांगितले. खेड पोलिसांनी काशिमीरा पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असून तेथील पोलीस त्यांच्या पालकांसह खेडला येण्यास निघाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular