मिऱ्या- नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटात कळकदारापर्यंत चौपदरीकरण होणार आहे. तिथून पुढे चार बोगद्यांचा प्रस्ताव आहे. हे बोगदे थेट आंबा गावात निघणार आहेत; परंतु सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये हा भाग येत असल्याने अद्याप या कामाला परवानगी मिळालेली नाही. तोपर्यंत कळकदरापासून पुढचा रस्ता तसाच राहणार आहे. परवानगीनंतर ते काम केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. समुद्रसपाटीपासून सुमारे २ हजार मीटर उंचीवर आंबा घाट आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या या घाटाची आजवर फक्त डागडुजीच केली जात होती; मात्र आता मिऱ्या नागपूर महामार्गामुळे हा घाट रूंद होऊन सुरक्षित वाहतुकीला त्याचा फायदा होणार आहे. मिऱ्या- नागपूर महामार्गाचे साखरप्यापासून पालीपर्यंत आणि हातखंब्यापासून मिऱ्यापर्यंत काम वेगात सुरू आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सपाटीकरण होत आले आहे; परंतु घाटामध्ये नेमके काय होणार, याबाबत अनिश्चितता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंबा घाटाचे कळकदरापर्यंत चौपदरीकरण होणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी डोंगर कापून रस्ता वाढवण्यात येत आहे.
तिथून पुढे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चार ते पाच बोगदे प्रस्तावित केले आहेत; परंतु सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये हा भाग येत असल्याने या कामाला अजून परवानगी मिळालेली नाही. नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत कळकदरा ते आंबा गावापर्यंतचा रस्ता तसाच ठेवला जाणार आहे. परवानगीनंतरच काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.