मुंबई पोलिसांना याबाबत गेले काही दिवस गोपनिय माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलीस सज्ज होते. संशयित ठिकाणांवर पोलिसांनी वॉच ठेवला होता. २ दिवसांपूर्वी मुंबईत फुटपाथवर राहणाऱ्या वाघरी कुटुंबातील लहान मुलांना चोरुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील कुरार पोलिसांनी ही कारवाई केली. ही टोळी मुलांची तस्करी करणाऱ्या एका बड्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुले नसणाऱ्या व्यक्तींना लहान मुले विकण्याचे कामही या टोळीकडून सुरु होते. एक-दीड वर्षाच्या मुलाला दीड ते दोन लाख रुपये घेवून विकणारी ही टोळी होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
महाराष्ट्रभर रॅकेट – या टोळीतील ६ जणांच्या मुसक्या आवळल्यानंतर राज्यव्यापी टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात ज्याज्या ठिकाणी मुले पळविण्याच्या किंवा पळवण्याचा प्रयत्न करताना नागरिकांच्या दक्षतेमुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपींशी या टोळीचे संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर्षी मुले पळवणारी टोळी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अशी टोळी सक्रीय असल्याची भिती पसरली होती. काही ठिकाणी मुलांना पळवण्याचा प्रयत्नही झाला होता.
रत्नागिरीतील खेड तालुक्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या एका चिमुरड्याला पळवून नेताना. आजूबाजूच्या रहिवाशांनी सतर्कता दाखवत संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मुंबईत पकडण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांचा या आरोपीशी काही संबंध आहे का याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान, मुले पळवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. इरफान फुरखान खान (वय २६), सल्लाउद्दीन नुरमोहमद सय्यद (वय २३), आदिल शेख खान (वय १९), तौफिर इकबाल सय्यद (वय २६), रझा अस्लम शेख (वय २५) आणि समाधान जगताप अशी अटक केलेल्या ६ संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.