HomeRatnagiriदेवरूखातील प्रसिध्द ज्वेलर्स धनंजय केतकरांचे अपहरण

देवरूखातील प्रसिध्द ज्वेलर्स धनंजय केतकरांचे अपहरण

अंगावरील सोन्याच्या तीन साखळ्या आणि २० हजार रुपये रोकड काढून घेण्यात आली.

देवरूखमधील प्रसिध्द केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय तथा तात्या गोपाळ केतकर यांची गाडी बुधवारी रात्री काही अज्ञातांनी अडविली. त्यांना गाडीबाहेर काढून अंगावर बुरखा टाकण्यात आला आणि त्यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांना आपल्या गाडीत कोंबले, यादरम्यान त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने आणि काही रोकड लुबाडण्यात आली. दरम्यान अपहरणकत्यांनी केतकर यांना मारहाण केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आल्याने त्यांना बोलताना त्रास होतो आहे. दरम्यान पोलीसांनी या ‘अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला असून तपास पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. बुधवारी रात्री हा प्रकार घडला असून गुरूवारी दिवसभर याच विषयाची जोरदार चर्चा संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात सुरू होती. अनेक तर्क-कुतर्क लढविण्यात येत होते. सोशल मिडियावर ही बातमी व्हायरल होताच खळबळ उडाली.

बुधवारी रात्रीचा प्रकार – अधिक वृत्त असे की, धनंजय केतकर हे बुधवारी रात्री १० ते १०.३० वा. च्या सुमारास आपल्या गाडीने साखरपा येथील त्यांचे मित्र बापू शेट्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपल्या गांडीने देवरूखकडे निघाले. वांझोळेपासून काही अंतरावर त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला. पुढील १ किलोमीटर अंतरावर त्यांची बीएमडब्ल्यू कार अडविण्यात आली. मारूतीच्या इटिंगा कारमधून ५ आरोपी खाली उतरले आणि त्यांनी तुमची गाडी आमच्या गाडीला घासली असे सांगत केतकर यांच्याशी वाद घातला. गाडीची नुकसानभरपाई मागितली.

बुरखा टाकला आणि – हा वाद सुरू असतानाच अचानक एका इसमाने धनंजय केतकर यांना गाडीतून खाली उतरविले आणि त्यांच्या अंगावर बुरखा टाकला. ३ ते ४ जणांनी त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत कोंबले आणि गाडी राजापुरातील वाटूळच्या दिशेने धावू लागली. वाटेत त्यांना मारहाण करण्यात आली. वाटूळ परिसरात ही गाडी येताच अपहरणकर्त्यांनी ती थांबवली आणि केतकर यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे पुन्हा वाद झाला.

लुबाडले – दरम्यान केतकर यांच्या अंगावरील सोन्याच्या तीन साखळ्या आणि २० हजार रुपये रोकड काढून घेण्यात आली. त्यानंतर केतकर यांच्या तोंडावर जबरदस्त मारहाण करत आरोपींनी पोबारा केला, असे चर्चिले जात आहे.

कुटुंबिय वाट पाहत होते – दरम्यान धनंजय केतकर यांचें कुटुंबीय त्यांची घरी वाट पाहत होते. त्यांची मुलगी बाबा अजून कसे घरी आले नाहीत म्हणून चिंतेत होती. तिने साखरपा येथील केतकर परिवाराचे मित्र बापू शेट्ये यांना फोन केला आणि बाबा आले नसल्याची कल्पना त्यांना दिली. तेव्हा ते आत्ताच येथून गेले आहेत, एक १० ते १५ मिनिटांत घरी परततील असे शेट्ये यांनी त्यांना सांगितले. परंतु बराच वेळ झाला तरी केतकर घरी न आल्याने कुटुंबियांनी पुन्हा एकदा बापू शेट्येंना फोन केला. शोधाशोध सुरू झाली.

बावनदीजवळ गाडी सापडली – पुन्हा फोन आल्याने वाटेत काही घडले तर नसेल ना, या शंकेने बापू शेट्ये साखरपा येथून देवरूखला येण्यासाठी निघाले. बावनदीच्याजवळ केतकर यांची गाडी त्यांना आढळली. बापू शेट्ये त्या गाडीजवळ पोहोचले. केतकर यांची मुलगीही त्याचवेळी तेथे पोहोचली. दोघांनीही धनंजय उर्फ तात्या केतकर (वय ६३) यांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यामुळे कुटुंबीय घाबरले. सुदैवाने काही वेळानंतर शेट्ये यांनी जेव्हा केतकर यांना फोन केला तो लागला आणि सारा उलगडा झाला.

५ लाख रूपयांची मागणी – या फोनवर बोलताना केतकर यांनी आपल्याला पळवण्यात आल्याचे सांगितले. ५ लाख रूपये मागितले आहेत ते दिल्याखेरीज माझी सुटका होणार नाही, असे सांगत मार्लेश्वर फाटा येथे एक इसम येईल, त्याच्याकडे रक्कम सोपवा, असे या फोनवरून सांगण्यात आले. मार्लेश्वर फाटा येथे केतकर यांचे घर आहे.

बापू शेट्येंचे प्रसंगावधान – हे ऐकून जि.प. चे माजी सदस्य बापू शेट्ये सावध झाले. त्यांनी प्रसंगावधान दाखवून याबाबतची माहिती देवरूखम धील आपल्या काही मित्रांना फोनवरून दिली. पैशांची जुळवाजुळव करण्यात आली. परंतु मार्लेश्वर फाटा येथे पैसे घेण्यासाठी कोणीच आले नाही. ‘त्यामुळे शेट्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवरूख पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला.

मध्येच सोडले – दरम्यान यानंतर रात्री केतकर यांना पुन्हा फोन केला असता आपल्याला संबंधितांनी दाभोळे-वाटूळ मार्गावर मध्येच सोडून दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस केतकर यांच्यापर्यंत पोहोचले. ते सुखरूप असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान याप्रकरणी अज्ञातांविरोधात देवरूख पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम गुन्हा ३११, ३०९(४), ३१० (१), १४० (२), १२७ (२), ११५ (२), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखलं करण्यात आला आहे. पोलीसांनी धनंजय केतकर यांची चौकशी केली आहे. मात्र त्यांच्या तोंडावर मारहाण झाल्याने बोलताना प्रचंड त्रास होत असल्याने पुरेशी माहिती मिळत नाही. तरीही पोलीसांनी तपासाला गती दिली आहे. या प्रकारामुळे साऱ्या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख नितीन बगाटे यांनी जातिनिशी तपासाची चक्रे फिरवली असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीसांची पथके काही ठिकाणी रवाना झाली आहेत. देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular