रत्नागिरी मध्ये सध्या घडत असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटनांवरून वातावरण गढूळ झाले आहे. त्यामध्येच मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याच्या अफवा पसरल्याने अनेक पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त झाले असून, त्यासोबतच सतर्क देखील झाले आहेत.
काल मेस्त्री हायस्कुल रत्नागिरी येथे काम करणारे मोईद्दीन मोहियुद्दीन महमद सय्यद यांनी सकाळी ११.३० वा चे सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे फोनकरुन कळविले की मेस्त्री हायस्कुल ता. जि. रत्नागिरी या परिसरात एक महिला संशयीतरित्या फिरत आहे. ही महिला मुलगा आजारी असल्याचे फोटो दाखवून आर्थिक मदत मागत फिरत होती. सकाळी त्या महिलेने मेस्त्री हायस्कूलमध्ये प्रवेश केला. ती महिला मुलं पळवणारी असल्याचा गैरसमज करून घेऊन त्या महिलेला इतर महिलांनी घेराव घातला. तिला उलटसुलट प्रश्न विचारून धक्काबुक्की केल्याने, तेथील वातावरण काहीसे तणावपूर्वक बनले होते.
पोलिसांना पाचारण केल्याने, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुक्ता भोसले यांनी त्याबाबत मा.वरीष्ठांना माहिती देवुन, मेस्त्री हायस्कुल येथुन आलेल्या फोनचे गांभीर्य लक्षात घेवुन लागलीच घटनास्थळी धाव घेतली. सदर वेळी मेस्त्री हायस्कुलच्या गेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.
गर्दी मधुन सदर महिलेस अधिक चौकशीकरिता पोलीस स्थानकात आणण्यात आले व तिला विश्वासात घेवुन विचारपुस करता सदर महिलेने तिचे नाव सारिका राहुन धुमाळ, वय ३२ वर्षे, रा. पंढरपुर रोड, धनराज हॉटेलच्यामागे, मिरज सांगली पण सध्या रा. खेडशी ता. जि. रत्नागिरी असे सांगितले. सदर महिलेचा गुन्हेगारी पूर्व रेकॉर्डची पडताळणी केली असता सदर महिलेविरुध्द मिरजपोलीस ठाणे जि. सांगली येथे कलम ४५२,३७९,३२३,३२४ भादविस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. म्हणुन सदर महिलेविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरामध्ये व परिसरामध्ये मुले पळविणारी कोणतीही टोळी सक्रीय नसुन त्याबाबत कोणतीही उपयुक्त महिती पोलीस विभागास द्यावयाची असल्यास कंट्रोल रुम संपर्क क्र. ०२३५२/२२२२२२, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे संपर्क क्र. ०२३५२/२२२३३३ व डायल ११२ संपर्क क्रमांकावर देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

