कोरोना लसीकरणाचा वेग राज्यात वाढत असून, आता लक्ष लहान मुलांच्या लसीकरणाकडे केंद्रित करण्यात आले आहे. शाळा सुरु करण्यात आल्याने, पालकांना सुद्धा कोरोनासंसर्गाच्या भीतीमुळे मुलांच्या तब्येतीबाबत काळजी असल्याने अनेक पालक शाळा ऑफलाईन सुरु केली असून सुद्धा शाळेत पाठविण्यास धजावत नाही आहेत.
परंतु, आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होत असून २ ते १८ वर्षाच्या मुलांना कोरोनाची लस लवकरच मिळणार आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन लस लहान मुलांना देण्यात यावी अशी शिफारस डीसीजीआयकडे केलेली.
देशातील १८ वयोगटातील बहुतांश लोकसंख्येचे वेगाने लसीकरण होत आहे. अशावेळी लहान मुलांना कधी लस देणार ! याबाबत अजून कोणतीच स्पष्ट घोषणा करण्यात आली नव्हती. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या शिफारसीनंतर आता लहान मुलांवरील म्हणजेच वयोगट २ ते १८ ची लस लवकरच सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतामध्ये अनेक राज्यांमधील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा हळूहळू सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये देशात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने अजून कोरोनाच्या भीतीचे सावट दूर झालेले नाही. आणि १८ वर्षाखालील लहान मुलांनाच या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका संभवणार असल्याचंही वर्तवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना संसर्गापासून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसीवर वेगवान गतीने काम करत आहेत.
पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ७ ते ११ वयोगटातील मुलांसाठी अमेरिकेची कंपनी नोवावॅक्सच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीनं भारतात या लसीचं नाव कोवावॅक्स ठेवलं आहे. सीरम इंस्टीट्यूटला ७ ते ११ वयोगटातील मुलांवरील लसीच्या ट्रायलसाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे.
कंपनीने ही ट्रायल देशभरातील १०० मुलांवर केली आहे. मात्र देशामध्ये हि लस आपत्कालीन वापरासाठी अद्याप तरी मंजुर करण्यात आलेली नाही. देशामध्ये आपत्कालीन वापरासाठी केवळ झायडस कॅडिलाच्या लसीलाच १२ वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना मंजुरी मिळालेली आहे.