रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गट) घेतले जात आहे. भाजपने यापूर्वी माजी आमदार प्रमोद जठार यांना ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जात होते. तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे विद्यमान आमदार विनायक राऊत हे निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. याच निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन आतापासूनच भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद सुरु झाला आहे. सामंत यांचे नाव शिवसेनेकडून घेण्यात आल्यानंतर सिंधुदुर्गातून विरोध झाला. या विरोधानंतरच किरण सामंत यांनी तिरकस चाल खेळल्याचे बोलले जात आहे.
नितेश राणेंचे उद्गार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत हे शिवसेनेतर्फे उमेदवार असतील अशी वृत्ते स्थानिक वृत्तपत्रांसह राज्य पातळीवरील वृत्तपत्रांमध्येही प्रसिध्द झाल्यानंतर कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. या मतदार संघात भाजपच निवडणूक लढवेत असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यापुढे जाताना किरण सामंत यांना हवे असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा वरिष्ठ विचार करतील असे म्हटले होते. या ऑफरनंतरच किरण सामंत यांनी चाल खेळल्याचे बोलले जात आहे.
करारा जबाब मिलेगा – किरण सामंत यांनी अचानक शुक्रवारी आपल्या व्हॉटसअप डीपीला ठाकरे गटाची निशाणी असलेले म शाल चिन्ह ठेवले. साहजिकच मशाल चिन्हाच्या खाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ही अक्षरे येतातच. मात्र त्यातच जो होगा वो देखा जायेगा असा डायलॉगही मारण्यात आला आहे. कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर किरण सामंत यांची आक्रमक प्रतिक्रिया उम टल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
होय स्टेटस ठेवले – होय मी मशालीचे स्टेटस ठेवले होते. मी लवकरच स्पष्ट बोलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी हे स्टेटस मागे घेतले आहे. योग्य वेळी या स्टेटसचे उत्तर देईन असे किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपला भाऊ उदय सामंत याचे राजकीय करिअर बाद होऊ नये म्हणून मी हा स्टेटस मागे घेत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेमका रोख कोणाकडे? – किरण सामंत यांनी ही टोलेबाजी केली खरी मात्र त्यांचा नेमका रोख कुणाच्या दिशेने आहे याची चर्चा आता सुरु आहे. आपण नेहमी शंभर टक्के खरे बोलतो, गरज असेल आणि एखादा अडचणीतून बाहेर येणार असेल तर मात्र खोटे बोलावे लागते असेही ते म्हणाले. त्यामुळे हा खोटा आव ते कोणासाठी आणत आहेत याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे म शाल स्टेटस ठेऊन स्वकीयांनाच इशारा देताना विरोधकांनाही त्यांनी आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशा शब्दात सुनावले आहे. एकंदरीत किरण सामंत यांच्या डीपीला मशाल चिन्ह ठेवणे आणि काही वेळानंतर ते काढून टाकणे याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही. किरण सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी मी या स्टेटसचे उत्तर देईन. याप्रमाणे वाट पहावी लागणार हे निश्चित. तूर्तास राजकारणातील वजीराने बुचकळ्यात टाकणारी खेळी केली आहे हे मात्र खरे.