पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक लाख ५१ हजार ६८१ शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे ३१ कोटी ४३ लाख १८ हजार रुपये जमा झाले आहेत; मात्र ई-केवायसीची पूर्तता नसलेले दोन हजार ४४४ शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. आतापर्यंत १६ हप्ते खात्यावर जमा झाले होते; मात्र १७ वा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता.
हा हप्ताही चार दिवसांपूर्वी जमा झाला आहे. जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार १९१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे; मात्र अद्यापही दोन हजार ४४४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना १७ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांपैकी एक लाख ५२ हजार ५३९ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप नऊ हजार १०२ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण झालेले नाही. ई-केवायसी करूनही पीएम किसान निधीचा हप्ता जमा झाला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर शिबिर घेऊन आधार संलग्नीकरण व ई-केवायसी शिबिर घेण्यात येत आहे. त्यामुळे १६वा हप्ता जमा झालेल्या शेतकऱ्यांपेक्षा १७ व्या हप्त्यावेळी एक हजार २०३ शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील एक लाख ५० हजार ४७८ शेतकऱ्यांना १६वा हप्ता मिळाला होता. त्यावेळी ३९ कोटी ७४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. शेतकरी संख्येपेक्षा रकमेची संख्या जास्त होती. प्रलंबित ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर थकलेली रक्कम जमा झाल्याने ही रक्कम वाढल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. ई-केवायसी, आधार संलग्नीकरण परिपूर्ण करूनही अद्याप ७ हजार ५१० शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळालेला नाही.