रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील जिल्हा परिषद धरण अखेर यावर्षी मंगळवारी २५ जून रोजी पूर्णपणे भरून वाहू लागले आहे. कळझोंडी धरण पूर्णपणे भरल्याचे समजताच जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचे लाभार्थी परिसरातील २२ पेक्षा जास्त गावांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी जयगड प्रादेशिक नळ पाणी योजनेचे सुपरवायझर दत्ताराम निंबरे, धरणाचे बांधकाम करणारे सर्जेराव माने, दत्ताजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज व्यवस्था पाहणारे शशिकांत शिंदे, राजू गायकवाड, सत्ताप्पा मेंडके, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप पवार, किशोर पवार आदी उपस्थित होते.
कळझोंडी धरणाची उंची वाढविणे व जॅकेटिंग तसेच ग्राऊटींग करणे इत्यादी कामे गेली दोन वर्षे सुरू होती. त्याचबरोबर रस्ता डांबरीकरण करणे, आर.सी.सी. ब्रीज बांधणे, सी.डी. वर्क काम करणे इत्यादी कामे पूर्णत्वास गेली असून कळझोंडी गावातील पूर्वीच्या नदीवरील तीनही पूल पाण्याखाली गेले आहेत. तर नव्याने बांधण्यात आलेले तीन पूल रहदारीसाठी सुरळीत उपलब्ध करण्यात आले आहेत. सदरचे काम जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले. ठेकेदार म्हणून स्वस्तिक कन्स्ट्रक्शन लि. कोल्हापूरचे सर्जेराव माने यांनी वेळेत व यशस्वीरित्या काम पूर्ण केले. रस्ता डांबरीकर करणे ही कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कळझोंडी धरणाची उंची वाढविल्यामुळे संपूर्ण धरण परिसर जलमय झाला आहे. सदरच्या पाण्याची पातळी विस्तारली असल्याने ही पातळी पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पर्यटक या परिसराला भेटी देत आहेत. थोड्याच दिवसात जयगड प्रादेशिक ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना अतिशय उत्तम प्रकारे चालविण्यासाठी मदत होणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे नियोजन प्रांताधिकारी जीवन देसाई, जि. प. ग्राम ीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी उपअभियंता अमोल दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचे सुपरवायझर दत्ताराम निंबद्रे यांनी उत्तम देखरेख ठेवली आहे.