राज्यात सध्या इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळानंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणांत विद्यार्थ्यांना दडपण हे असतेच. परंतु, दडपणाशिवाय आणि टेंशन विरहित परीक्षा देण्यासाठी अनेक कॉलेजमध्ये समुपदेशन शिबिरे घेतली जातात. परंतु, रत्नागिरीमधील एका १२ वीच्या विद्यार्थिनीने इंग्रजी विषयाचा पेपर कठीण गेल्याने, घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाकडून आणि कोकण बोर्डाकडून सर्व विद्यार्थाना एखादा पेपर कठीण गेला अगर एक वेळ अपयश आले तरीही याच वर्षी जून जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यामुळे पुढील शिक्षण याच वर्षी पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्याला मिळेल, याचा विचार करून विद्यार्थ्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बारावी परीक्षेचा पहिलाच पेपर देवून आल्यानंतर रत्नागिरीतील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागासह कोकण बोर्डाकडून शिक्षकांसह मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पावले उचलली आहेत. विद्यार्थीनीच्या पालकांची भेट घेवून अधिकार्यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी कोकण मंडळाच्या सहसचिव भावना राजनोर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी गोपाळ, एन. डी. गावंड, कक्ष अधिकारी चंद्रशेखर चौगुले आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शहरातील फाटक प्रशालेतील प्राचार्यांसह शिक्षकांशी चर्चा करीत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी नाराज न होता परीक्षा द्यावी, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे. बारावीची परीक्षा ४ मार्चपासून चालू झाली असून दहावीची १५ मार्चपासून परीक्षा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षेस सामोरे जावे. तसेच पालकांनी देखील आपल्या पाल्यांना वेळोवेळी योग्य मानसिक आधार द्यावा त्यांचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी.