रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अगदी तळागाळात देखील विविध प्रकारची कलागुण असलेले अनेक मंडळी आहेत. त्याचप्रमाणे कोकणाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तो वेगळाच. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या विविध प्रसिद्ध वास्तू किंवा वस्तू जिथे चित्रीकरण करून देखील त्याबाबतची माहिती जगामध्ये पोहोचवण्याचे काम शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून स्थानिक माहितगार कलाकार करताना दिसत आहेत.
रत्नागिरीमध्ये दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात इटली येथे फेस्टिवल डेला कम्युनीक्याझीओन ई डेल सिनेमा ओर्कीओलॉजीको हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. ऑक्टोबर २०२२ मध्ये साजरा केल्या जाणाऱ्या या फिल्म फेस्टिवलमध्ये कोकणातील कातळशिल्प विषयावर आधारित शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली आहे.
पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा फेस्टिव्हल आहे. जगभरातील इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विषयातील तज्ज्ञ मंडळींची उपस्थिती याला लाभणार आहे. या शॉर्ट फिल्मची निर्मिती रत्नागिरी स्थित निसर्गयात्री संस्था आणि पुण्यातील दृश्यम कम्युनिकेशन्स यांनी केली आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन राहुल नरवणे यांनी केले असून लेखन आणि निवेदन रत्नागिरीची सुकन्या सायली खेडेकर यांनी केले आहे.
शॉर्ट फिल्म कोकणातील कातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन यावर आधारित आहे. कोकणातील कातळशिल्प या विषयावरील सविस्तर माहितीपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आमच्यासाठी तसेच कोकणासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. सिनेमॅटोग्राफर सतीश शेंगाळे, एडिटर मदन काळे, सत्यम अवधूतवार, मयुरेश कायंदे, दत्ता मानकर, म्युझिकसाठी ओंकार रापतवार यांनी विशेष श्रम घेतले आहेत. आमच्यासाठी तसेच कोकणासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड यांनी व्यक्त केली.

