२२ जुलैच्या झालेल्या अतिव्रुष्टीमुळे रत्नागिरी-कोल्हापूरला जाताना लागणारा आंबा घाट दरडी कोसळल्याने तो रस्ता खचला होता. त्यामुळे साधारण २२ दिवस महामार्ग पूर्णत: बंद करून, एका ठिकाणी नवीन रस्ता बांधण्यात आला, तर इतर ठिकाणी अति पावसामुळे दरड कोसळण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. डागडुजी नंतर फक्त लहान वाहनांनसाठीच परवानगी देण्यात आली होती.
काही अवजड वाहने तेथे दंड करून पुढे पाठवली जात असल्याचे वृत्त कानावर आल्याने वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून, आता अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी पुन्हा तिथे लोखंडी कमान लावण्यात आली आहे. यामुळे आता आंबा घाटातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ट्रक व्यावसायिक, पोलीस खाते, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या तील वाद अखेर संपुष्टात आला आहे.
राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्राशी कोकणाला जोडणारा आंबा घाट अवजड वाहतुकीला अजूनही पूरक नसल्याने, या मार्गावरून अजूनही अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही.
दोन ठिकाणी तर एका बाजूने रस्ता पूर्ण खचला असून, तेथे आता तळातूनच संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यासाठी खर्च साधारण साडेचार कोटीच्या दरम्यान येणार असून, लवकरच या कामाला आरंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यास अजून दीड महिन्याचा अवधी लागणार असल्याची शक्यता आहे.