कोकण पट्ट्यामध्ये पावसाची तुफान खेळी सुरु असून वाहतुकीवर देखील त्याचा मोठा परिणाम झालेला जाणवत आहे. मागील आठवडाभर पाऊस मुसळधार पडतोच आहे. अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे, दगड, डोंगर रस्त्यावर आले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील खेड तालुक्यात अंजनी स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडल्याने वाहतूक बंद झाली आहे. कोकणात पावसाची संततधार सुरू असून गुरुवारी दि. १३ रोजी पहिल्यांदाच कोकण रेल्वेच्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे.
खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकानजीक रुळावर माती व दगड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे खेड रेल्वे स्थानकात मत्स्यगंधा, मांडवी एक्स्प्रेस थांबवण्यात आली आहे. गेल्या दोन तास पेक्षा अधिक काळ प्रवासी खेड स्थानकात अडकून पडले आहेत. रेल्वे रुळावर आलेली माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर रेल्वे यंत्रणेकडून सुरू करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर माती आल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम झाला. मांडवीसह मुंबईकडे जाणारी एक अशा दोन रेल्वे गाड्या दोन तास स्थानकातच थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रासाला तोंड द्यावे लागले हा प्रकार दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला. गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे.
चिपळूण अंजनी रेल्वेमार्गावर माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र कोकण रेल्वेच्या कर्मचा यांनी तातडीने दखल घेत काम सुरू केल्याने रुळावर आलेली माती बाजूला करण्यात यश आले आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असल्याचे व व रखडलेल्या गाड्या मार्गस्थ होत असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी स्पष्ट केले आहे.