मुसळधार पाऊस आणि जादा गाड्यामुळे वाहतुकीवर आतापासूनच परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेश उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. या गाड्या सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. नियमित गाड्या एक ते दोन तास उशीराने धावत आहेत. मुसळधार पाऊस आणि गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या अधिकच्या गाड्यामुळे वाहतुकीवर आता पासूनच परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई सीएसटी ते सावंतवाडी गाडी क्रमांक ०११३७ ही गाडी १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये धावणार आहे. मुंबई सीएसटी येथून रात्री साडेबाराला सुटून, ही गाडी सावंतवाडीला दुपारी दोनला पोहोचणार आहे. परतीसाठी गाडी क्रमांक ०११३८ ही सावंतवाडी येथून दुपारी अडीचला सुटून मुंबईला पहाटे पावणे चारला पोहोचणार आहे.
नागपूर ते मडगाव ही गणेश उत्सवासाठी विशेष गाडी दर बुधवारी आणि शनिवारी नागपूर येथून २७ जुलै ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये सुटणार आहे. नागपूर येथून गाडी क्रमांक ०११३९ ही दुपारी ३.०५ वाजता सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाचला पोहोचणार आहे. परतीसाठी गाडी क्रमांक ०११४० ही दर गुरुवारी आणि रविवारी २९ सप्टेंबर पर्यंत मंडगाव येथून सायंकाळी सातला सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला रात्री साडेनऊला पोहोचणार आहे.
पुणे ते कुडाळ ही गाडी पुणे येथून दर मंगळवारी सुटणार असून १६ ऑगस्ट ते ६सप्टेंबर या कालावधीमध्ये ही गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक ०११४१ पुणे येथून रात्री साडेबाराला सुटून कुडाळला दुपारी दोनला पोचणार आहे. परतीसाठी कुडाळ येथून त्याच दिवशी दुपारी साडेतीनला सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५०ला पोहोचणार आहे. पनवेल ते कुडाळ ही गाडी पनवेल येथून दर रविवारी ११ सप्टेंबर पर्यंत सुटणार आहे.