कोकणामध्ये राजापूर बारसू परिसरात येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रोजेक्टला काही प्रमाणात अजूनही विरोध आहेच. मात्र, याचवेळी रिफायनरी समर्थकांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशिक्षण केंद्र रिफायनरी प्रकल्पाकडून उभारले जाणार असल्याचे संकेत देत या व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्राला कोकणचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्त्व भागोजीशेठ किर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या प्रकल्पाचे समर्थन करत रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कोकणातील या पितृतुल्य दानशूर व्यक्तीचे नाव देऊन त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांचे कै. भागोजीशेठ किर हे आराध्य दैवत असून आरआरपीसीएल तर्फे कोकणात स्थापन करण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राला भागोजीशेठ किर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र असे नाव देण्यात यावे अशी मागणी महासंघातर्फे करण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, महिला अध्यक्षा सुश्मिता तोडणकर, उपाध्यक्ष प्रविण आचरेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, महासंघाचे रिफायनरी समन्वयक पंढरीनाथ आंबेरकर, दादर भंडारी मंडळाचे उपाध्यक्ष यश केरकर, सचिव विनोद चव्हाण आरआरपीसीएल कंपनी सेक्रेटरी राजू रंगनाथन आदि उपस्थित होते.
भारतातील तेल क्षेत्रातील अग्रगण्य अशा इंडियन ऑईल, हिंदूस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम यांनी एकत्रित येऊन रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडद्वारे कोकणात एक मोठा रिफायनरी प्रकल्प उभारण्याचे योजिले आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम दरम्यान व प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर स्थानिक लाखो तरूणांना कोकणामध्ये नोकरी व व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे. स्थानिक युवकांना प्रशिक्षित करून नोकरी व व्यवसायाभिमुख करण्याचे कंपनीचे धोरण असल्याचे कळते. त्याकरीता भव्य असे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी जिल्हयात उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.