देवरुख येथील मराठा भवन येथे आयोजित संगमेश्वर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या महिला मेळाव्यात खा.विनायक राऊत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यावेळी त्यांनी माहिती दिली कि, सिंधुरत्न योजनेत ऐंशी टक्के सबसिडी आहे. या करिता पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींची तरतूद केली आहे. याचा लाभ घेऊन घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबी बनावे.
वेगवेगळ्या स्तरावर महिला जिद्दीने पुढे आल्या आहेत. या महिलांनी आपल्या बरोबरच गावातील महिलांना सोबत घेऊन महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे. कोरोनात अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्यात, मात्र या साऱ्यांना उभं करण्याची जबाबदारी आपली आहे. या करीता शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ सर्वांना मिळेल याकडे लक्ष द्या असे आवाहन खा. राऊत यांनी केले.
महाराष्ट्राचे तब्बल पन्नास हजार कोटी पेंडिंग आहेत. मात्र त्या बद्दल संसदेत आवाज उठवला तर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत. महागाई प्रचंड वाढली आहे. मात्र केंद्र सरकारला गरिबांबद्दल काहीही पडलेलं नाही अशी बोचरी टीका केंद्र सरकारवर त्यांनी केली. त्यावेळी नेहा माने यांनी महिला सबलीकरण, ई श्रम कार्ड, बचतगटांनी कशा प्रकारे सक्रिय झाले पाहिजे असे मुद्दे प्रास्तावीक करताना मांडले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रमुख नेहा माने यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या मीनाताई कांबळी, सौ नेहा माने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, आम. सुभाष बने, सदानंद चव्हाण, माजी सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा संघटक वेदा फडके, जि.प सदस्य रोहन बने, सौ. रचना महाडिक, माजी शिक्षण सभापती सौ. ऐश्वर्या घोसाळकर, आदीसह जिप सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेविका आदी उपस्थित होते.