हवामानामध्ये सातत्याने दिवसेंदिवस बदल होत आहेत. उष्णतेने तर अक्षरशः कहर माजला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह इतर राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने सोमवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या २१ आणि २२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असे भाकीत भारतीय हवामान विभागाने केले आहे.
या अवेळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे. तसेच देशातील आसाम व मेघालय राज्यात गारपीट पाऊस होईल, असे हवामान विभागाने कळविले आहे. महाराष्ट्रामध्ये भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यात तीव्र उन्हामुळे राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडल्यास काही प्रमाणात उन्हाची झळ कमी होऊन दिलासा मिळू शकतो.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच सातारा, कोल्हापुरामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळनंतर अचानक वादळी वारा आणि विजांसह गडगडाटी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान आजही राज्यातील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे अंगाची सध्या लाही लाही होत असताना राज्यात २ दिवस वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळा सुरु झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अनेकदा अवकाळी पाऊस पडला आहे. त्याचा फटका आंब्यासह इतर पिकांना बसलेला आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे