कोकणामध्ये सध्या हापूस आंब्याचा हंगाम सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात बागायतदार उत्पन्न वाढविण्याकडे आणि खरेदी विक्रीकडे लक्ष देऊन आहेत. परंतु या वातावरणाच्या लहरी पणामुळे फळ प्रक्रीयेवर त्याचा दुष्परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पडलेल्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी साखरप्यासह काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली, काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला, दिवसभर असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे निरुत्साही वातावरण राहिले. अति उष्मा, थंडी, पाऊस यांचा परिणाम हापूसवर होणार असून आंबा काढणी करताना बागायतदारांना काळजी घ्यावी लागणार आहे.
गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये पाऊस झाला. दुपारपर्यंत वातावरण व्यवस्थित होते, मात्र सायंकाळी ढग भरुन आले. किनारी भागात गार वारे वाहू लागले होते. वातावरणातील बदलांमुळे बुरशीजन्य रोगांसह किडींचा प्रादुर्भाव होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
साखरप्यासह संगमेश्वर, लांजा पट्ट्यात पावसाची नोंद झाली. आंबा हंगाम मध्यात आलेला असतानाच अवकाळी पावसाने बागायतदारांची धांदल उडाली. एप्रिल महिन्यात मागील वर्षाच्या मानाने आणि वातावरणातील वारंवार बदलाने उत्पादन कमी असून मे महिन्यात शेवटचे काही दिवस मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन होईल या आशेवर बागायतदार आहेत. पण अधुनमधून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळ गळती, बुरशीसह दर्जाहीन फळांच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. पावसाची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांनी फळे वेळेत काढणीचे वेळापत्रक ठरवावे अशा सुचना कोकण कृषी विद्यापिठाकडून एका पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.