मालवण येथे २७ सप्टेंबर रोजी पार पडणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देण्यात आले आहे. ना. राणे यांनी हे निमंत्रण स्वीकारत, कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी होणार असल्याची ग्वाही आयोजकांना दिली आहे. त्याचप्रमाणे जिल्हयाच्या आणि सोबतच कोकणच्या पर्यटन विकासासाठी आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही देखील ना. राणे यांनी पदाधिकार्यांना दिली.
पुढे त्यांनी त्या पदाधिकाऱ्याना सांगितले कि, पर्यटन महासंघानेही योग्य दिशेने काम करावे, जेणे करून सिंधुदुर्गची आंतराष्ट्रीय पर्यटन नकाशावर वेगळी ओळख निर्माण करता येईल. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेदरम्यान ना. राणे यांनी जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय, साहसी पर्यटन, कृषी पर्यटन, निवास न्याहारी, आदरातिथ्य अशा अनेक विषयांवर इतर देशातील पर्यटनाचा संदर्भ देवून संबंधिताना मार्गदर्शन केले. सदर बैठकीला महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यानी रापण संघ आणि हॉटेल व्यवसायिकांच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, साहसी पर्यटन प्रमुख कमलेश चव्हाण, सावंतवाडी अध्यक्ष जितेंद्र पंडित, संघाचे सचिव अॅड. नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष डि. के. सावंत, मालवण अध्यक्ष अविनाश सामंत इत्यादींची उपस्थिती होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळाच्या निमित्ताने देश आणि देशाबाहेर पर्यटनासाठी मोठी संधी चालून आली आहे. त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने पर्यटन व्यवसाय वाढीसाठी स्थानिकांना सोबत घेऊन, आपण प्रयत्न करणार असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अधिकार्यांशी चर्चा करून जिल्ह्यात आणि कोकणात स्थानिक पर्यटन भिमूख कोणते नवनवीन प्रकल्प आणता येतील, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण स्फूर्तीचे संचालक अॅड. नकुल पार्सेकर यांनी भेट म्हणून राणेंना जांभूळ मोदक दिले. तर कोकण निसर्ग मंचाचे कार्यवाह व कॉनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर यांनी भेट म्हणून बांबूच्या चटईवर लेझर इनग्रेव्ह केलेले ना. राणे यांचेच पोर्टेट त्याना दिले. पुढील दौर्यामध्ये आपण कॉनबॅक व कोकण स्फूर्ती या दोन्ही प्रकल्पाना आवर्जून भेट देणार असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.