कोकण पट्ट्यामध्ये अनेक नामवंत डॉक्टर उपलब्ध आहेत. पण त्या परीचे अद्ययावत रुग्णालय कोकणात नसल्याने ते व्हावे यासाठी अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधीकडे मागणी करण्यात येत आहे. अद्ययावत उपचारासाठी कोकणातील रुग्णांना मुंबई, पुणे , कोल्हापूर याठिकाणी हलवावे लागते. तसेच कोकणामध्ये लायन्स हॉस्पिटलसारखी जनसेवा करणारी रुग्णालये सुद्धा आहेत, जि अनेक गोर गरीब जनतेच्या उपचारासाठी कटिबद्ध आहेत. तिथे सुद्धा कमी खर्चामध्ये अथवा दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना खर्चिक शस्त्रक्रिया मोफत स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जातात.
कोकणामध्ये अवयव रोपण सारख्या किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने, कोल्हापूर किंवा मुंबई, पुणे येथे जाण्यास सांगितले जाते. परंतु, काल चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये पहिली यशस्वी नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. नदीम खतीब यांनी ही कामगिरी केली. ८० वर्षीय रूग्णाला या निमित्ताने जणू नवी दृष्टी प्राप्त झाली.
कोकणातील ही पहिलीच नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने कोकणातील रूग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास डॉ. खतीब यांनी व्यक्त केला. कारण बाहेरगावी जाऊन करण्यात येणारे उपचार आणि तेथील आर्थिक भार सुद्धा परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे अनेक रुग्ण उपचाराविना सुद्धा जीवन जगात असतात.
डॉ. खतीब या नेत्ररोपण शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना म्हणाले कि, ८० वर्षीय रुग्णाची डाव्या डोळ्याची दृष्टी कमी झाली होती. स्लिट लॅम्प तपासणीनंतर रूग्णाला कॉर्नियाला डाग म्हणजेच तो भाग पांढरट पडल्याने अस्पष्ट दिसत असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांना डाव्या डोळ्याच्या नेत्ररोपणाची आवश्यकता होती. त्यानुसार येथील लाईफकेअर रूग्णालयातील नेत्ररोगतज्ञ ९ फेब्रुवारीला या रूग्णावर यशस्वी नेत्ररोपण शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेनंतर आता रूग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांची दृष्टी सुधारली आहे. काही दिवसांनी सदर रूग्ण चष्म्याच्या मदतीने व्यवस्थित पाहू शकतील असेही डॉ. खतीब म्हणाले. कोकणात रोपणसारखी शस्त्रक्रिया होऊ लागल्याने नक्कीच हि प्रत्येक कोकणवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.