रत्नागिरीतील एका सोन्याच्या व्यापाऱ्याची कोल्हापूर येथील सोन्याच्या व्यापाऱ्यांकडून तब्बल ३ कोटी २ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याने कोल्हापूर येथील विनायक बंडूजी पोतदार व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे दरम्यान या फसवणूकीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, रत्नागिरीतील राजेंद्र वसंत चव्हाण हे अर्हम् आणि ए जी गोल्ड फर्म कंपनीत मॅनेजर म्हणून व्यवसाय पाहत आहेत. या फर्मचा मुंबई व रत्नागिरी येथे देखील त्यांचा सोन्याचा होलसेल व्यापार आहे. तक्रारदार चव्हाण यांनी कोल्हापूर येथील व्यापारी विनायक बंडूजी पोतदार यांच्या माध्यमातून सोन्याचे व्यवहार केले. १८ फेब्रुवारी २०२५ आणि १ मार्च २०२५ रोजी झालेल्या सोन्याच्या व्यवहारासाठी तक्रारदार चव्हाण यांनी २२ कॅरेट सोन्याचे सुमारे १ किलो ९८७ ग्रॅम इतक्या प्रमाणात सोनं विकले होते. या व्यवहाराची एकूण किंमत १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक होती. याचप्रमाणे इतर बिलांद्वारे देखील एकूण ३ कोटी २ लाख ६३ हजार ९३० इतका आर्थिक व्यवहार झाला होता.
मात्र, त्यातील रक्कम अदा करण्यात आली नाही. तक्रारदाराच्या नावाने दिलेले धनादेश नंतर पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर अशा कारणावरून बँकेकडून परत आले. विनायक पोतदार यांनी दिलेले बँक चेक हे अनुक्रमे १,५०,२८,३०७ आणि १,५२,३८,६२३ इतक्या रकमांचे होते. मात्र, हे दोन्ही धनादेश बँकेकडून थांबविण्यात आले. यानंतर संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणात तक्रारदार चव्हाण दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील सोन्याचे व्यापारी विनायक बंडूजी पोतदार व त्यांचे सहकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस पुढील कारवाई काय करतात? याकडे लक्ष लागले आहे.

