मुंबई येथून कोकणात येण्यासाठी दोन महामागाचे काम सुरू असताना आता तिसरा महामार्ग करण्याचा घाट घातला गेला असून ग्रीनफिल्ड द्रुतगती हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे. हा कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग सहा पदरी असणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग या सहा पदरी ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेसवेच्या कामासाठी शंभर मीटर रुंद भूसंपादनाला शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे ३८८.४५ किमी महामार्ग उभारण्यात येणार आहे. सदरचे काम चार टप्प्यात केले जाणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई येथील प्रास्तावित आतंरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या मार्गासाठी अमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गासाठी विविध पर्यायी आखणीचा अभ्यास करून चार टप्प्यातील अंतिम आखणी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ग्रीनफिल्ड द्रुतगतीवरून ताशी शंभर किलोमीटर वेगाने प्रवास केला जाणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा हा मुंबई ते सिंधुदुर्ग असा महामार्ग असणार आहे. महाविकास आघाडी शासनाच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यम न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ मार्च २०२० या संदर्भात विधिमंडळात घोषणा केली होती.
त्याला राज्यसरकारने मंजुरी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार प्रवेश नियंत्रित सहपदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधणे, प्रती तास शंभर किमी वेगसाठी संकल्पित करणे, त्या नुसार शंभर मिटर रुंद भूसंपादनसाठी शासनाने मान्यता दिली आहे. या मार्गाची आखणी कोकण किनारपट्टी जवळून केली जाणार आहे. जेणेकरून कोकणच्या निसर्गसंदर्याचे दर्शन प्रवास करताना होईल हाही उद्देश ठेवण्यात आला आहे.
कोकणात आता महामार्गाचे जाळे विणले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या चार महामार्गाचे काम सुरू आहे. मीऱ्या रत्नागिरी ते नागपूर, मुंबई गोवा, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, आणि आता नवीन असणारा कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग असे चार महामार्ग आहेत. आता सध्या मुंबई येथून कोकणात येण्यासाठी दोन महामार्गाचे काम सुरू आहे आणि आता तिसरा ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग येऊ घातला आहे.

