राज्यातील एकूण मत्स्योत्पादनापैकी ७२ टक्के उत्पादन ७२० कि. मी. लांबीच्या कोकण किनारपट्टीवर होते. त्यातील १२०० कोटीचे उत्पादन निर्यात होत असतानादेखील मत्स्यविज्ञान विद्यापीठ कोकण किनारपट्टीला न होता ते राजकीय दबावामुळे एक हजार किलोमीटर दूर असलेल्या नागपूरला झाले. कोकणावर झालेला हा अन्याय नवनिवार्चित मत्सोद्योग मंत्री ना. नितेश राणे दूर करतील आणि कोकणात मत्स्य विदयापीठ होईल अशी आशा आता सर्वसाधारण कोकणी माणसाला लागली आहे. कोकणला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनारपट्टीवर पिढ्यानपिढ्या मासेमारी व्यवसाय चालू आहे. कोकणच्या या किनाऱ्यावरील मासेमारीवर अवलंबुन असणाऱ्या कुटुंबांची संख्या ५ लाखांच्यावर आहे. लाखो मच्छीमार आहेत. एकंदरीत मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल या व्यवसायातून होत असते.
नागपूरमध्ये समुद्र नाही. त्याठिकाणी तलावातील गोड्या पाण्यातील मासेमारी होते. गोड्या केवळ पाण्यातील १.५७ लाख मेट्रिक टन मत्स्योत्पादनाकरिता नागपूरला कॉलेज सुरू करणे हे एकवेळ समजण्यासारखे आहे; पण मत्स्यविज्ञान विद्यापीठ कोकणात न होता नागपूरला असणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न गेले कित्त्येक वर्षे कोकणी माणसाला सतावत आहे. १९९८ ला पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुरात अस्तित्वात आल्यानंतर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रे, पशुधन प्रशिक्षण व रत्नागिरीतील मत्स्य विज्ञानं महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापिठाला जोडण्याचा उफराटा निर्णय झाला. महाराष्ट्रातून बरीच ओरड झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २००० ला महाराष्ट्र सरकारने नोटिफिकेशन काढून मत्स्य विज्ञान महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापिठाला संलग्न ठेवण्याचा झाला. निर्णय
रत्नागिरी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय शिरगाव येथील पदविका प्रमाणपत्रे विधी ग्राह्य करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला होता. यावर चर्चा होत असताना तत्कालीन मंत्री रामदासभाई कदम एकदा संतापले होते आणि कोकणात मत्स्य विद्यापीठ का होत नाही? असा खडा सवाल केला होता. उच्च न्यायालयाने रत्नागिरी येथील महाविद्यालयाबाबत मत नोंदविताना सरकारवर आक्षेप नोंदविले आहेत. एवढे असताना आपण योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. जर का कोकणात मत्स्य विद्यापीठ होणार नसेल तर कोकणातला समुद्रच नागपूरला घेऊन जा, असे खडे बोल ना. कदम यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकाराला सुनावले होते त्याची एकच चर्चा झाली होती.
कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता नाही अशी आश्चर्यकारक कबुली राज्याचे तत्कालीन म त्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी एकदा विधान परिषदेत दिली होती. त्यावेळी जानकर यांचावर सर्वच संतापले होते. विधानपरिषदेत तत्कालीन आमदार हुस्नबानु खलिफ, प्रवीण दरेकर आणि रवींद्र फाटक इत्यादींनी याबाबतीत प्रश्न विचारला होता. आता ना. नितेश राणे याबाबत लक्ष घालून कोकणात मत्स्य विद्यापीठ आणण्यासाठी कामाला लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.